‘आउटलूक’वर ७५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
By Admin | Updated: July 28, 2014 02:20 IST2014-07-28T02:18:02+5:302014-07-28T02:20:05+5:30
माजी मुख्य न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांची न्यायालयात धाव

‘आउटलूक’वर ७५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
पणजी : गोव्याचे पुत्र असलेले अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी येथील दिवाणी न्यायालयात आउटलूक या साप्ताहिकाविरुद्ध ७५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. या प्रकरणी न्यायालयाने आउटलूकचे मुख्य संपादक कृष्णा प्रसाद यांच्यासह चौघांना समन्स बजावले आहे. पुढील सुनावणी ५ आॅगस्ट रोजी ठेवली आहे.
या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या लेखातून आपली बदनामी झाल्याचे फेर्दिन यांचे म्हणणे आहे. गोव्यातील रिबेलो यांचे पॉवर आॅफ अॅटर्नी अॅड. मारियो पिंटो आल्मेदा यांच्यामार्फत दाखल केलेल्या या खटल्यात पोर्तुगीज नागरी संहितेतील कलम २३६१, २३६२, २३६३ (२३८९ सह) या कलमांचा आधार त्यांनी घेतला आहे.
आउटलूकचे माजी मुख्य संपादक विनोद मेहता, प्रकाशक महेश्वर पेरी, मेसर्स आउटलूक पब्लिशिंग इंडिया कंपनीलाही या खटल्यात प्रतिवादी केले आहे. ५ आॅगस्ट रोजी या सर्वांना स्वत: उपस्थित राहावे किंवा प्रतिनिधी पाठवावा व बचावासाठी म्हणणे सादर करावे, असे बजावले आहे.
संबंधित लेखात काही न्यायमूर्तींची छायाचित्र प्रसिध्द केली होती, ज्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत चौकशी चालू होती आणि यात न्यायमूर्ती रिबेलो यांचेही छायाचित्र होते. ताज कॉरिडोर प्रकरणात मायावतींना अनुकूल आदेश झाला होता. रिबेलो यांची मायावतींशी भेट झाल्यानंतर काही दिवसांतच हा आदेश देण्यात आला. मायावतींना नोटिसा काढणाऱ्या न्यायाधीशाला बाजूला ठेवून रिबेलो यांनी संपूर्ण खटला आपल्या नियंत्रणात घेतल्याचा आरोप या लेखातून केला होता.
(प्रतिनिधी)