कोकण रेल्वेचा मार्ग पूर्णत: सुरक्षित
By Admin | Updated: April 1, 2015 01:54 IST2015-04-01T01:49:24+5:302015-04-01T01:54:35+5:30
मडगाव : कोकण रेल्वेच्या मार्गावर वाढते अपघात हा जरी प्रवाशांसाठी चिंतेचा विषय असला, तरी हा मार्ग रेल्वे वाहतुकीसाठी पूर्णपणे सक्षम असल्याचा

कोकण रेल्वेचा मार्ग पूर्णत: सुरक्षित
मडगाव : कोकण रेल्वेच्या मार्गावर वाढते अपघात हा जरी प्रवाशांसाठी चिंतेचा विषय असला, तरी हा मार्ग रेल्वे वाहतुकीसाठी पूर्णपणे सक्षम असल्याचा दावा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केला आहे. रेल्वे सुरक्षा मंडळाकडून जानेवारी महिन्यात या मार्गाचे ‘सुरक्षा आॅडिट’ करण्यात आले होते. त्या वेळी हा मार्ग सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे ते म्हणाले.
मडगाव-रत्नागिरी मार्गावर कोकण रेल्वेने सुरू केलेल्या पॅसेंजर गाडीचे उद्घाटन करण्यासाठी प्रभू हे मंगळवारी मडगावात आले होते. या वेळी त्यांनी रेल्वे सुरक्षा आणि प्रवाशांना सोयी या दोन्ही गोष्टींवर रेल्वे मंत्रालय जास्त भर देणार असल्याचे सांगितले. मडगाव-रत्नागिरी गाडी ही केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर व्यापाऱ्यांसाठीही सोयीची होणार असल्याचे ते म्हणाले. गोवा व कोकणचा रेल्वे माध्यमातून पर्यटनदृष्ट्या कसा विकास करता येणे शक्य आहे, तेही पाहिले जाईल, असे ते म्हणाले.
या वेळी बोलताना कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. भानू तयाल यांनीही कोकण रेल्वेचा मार्ग सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक नाही, असे मत व्यक्त केले.
पावसाळ्यात या मार्गावर कित्येकदा दरडी कोसळतात, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, कोकण रेल्वेचा मार्ग दरडमुक्त होण्यासाठी आणखी किमान तीन वर्षे जावी लागतील. या दरडी रोखण्यासाठी आतापर्यंत कोकण रेल्वेने ३00 कोटी रुपये सुरक्षेच्या उपायावर खर्च केले आहेत आणि आणखी २00 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी ठेवली आहे. सध्या या मार्गावरून धावणाऱ्या गाड्या प्रति तास १२0 कि.मी. या गतीने धावत आहेत. हा मार्ग दरडमुक्त झाल्यास ही गती प्रति तास १३0 कि.मी. होईल, असे ते म्हणाले.
कोकण रेल्वेच्या मार्गाचे दुपदरीकरण आणि या मार्गाचे विद्युतीकरण करण्याचे काम हाती घेतले असून या कामासाठी सुमारे ११ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी रेल्वेने जागतिक बँक व जायका या दोन यंत्रणांकडे वित्त पुरवठ्यासाठी संपर्क साधला आहे. त्याशिवाय एलआयसीच्या माध्यमातून रेल्वे दीड लाख कोटींचा निधी जमवणार आहे. येत्या पाच
वर्षांसाठी रेल्वे सुधारणा व इतर सोयींसाठी १0 लाख कोटी रुपये खर्च करण्याची तयारी रेल्वेने ठेवल्याची माहिती त्यांनी दिली.
(प्रतिनिधी)