आरजीच्या पदयात्रेला चाप; सत्तरी तालुक्यात १४४ कलम लागू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 15:13 IST2023-02-23T15:12:47+5:302023-02-23T15:13:35+5:30
सत्तरीत १४४ कलम लागू केले आहे. त्यामुळे आरजीच्या पदयात्रेला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

आरजीच्या पदयात्रेला चाप; सत्तरी तालुक्यात १४४ कलम लागू
लोकमत न्यूज नेटवर्क, वाळपई : सत्तरीत आरजीच्या पदयात्रेला परवानगी नाकारली असून, तसा आदेश सत्तरी तालुका उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांनी दिला आहे. त्याचबरोबर सत्तरीत १४४ कलम लागू केले आहे. त्यामुळे आरजीच्या पदयात्रेला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
सोमवार (दि. २०) पासून आरजीची पदयात्रा सुरू झाली होती. ती ठाणे डोंगुर्ली येथे पोलिसांनी रोखली. त्यानंतर पदयात्रा सुरू झाली; पण कोपार्डे येथे पुन्हा रोखली गेली. त्यानंतर त्याचा निर्णय सत्तरी उपजिल्हाधिकारी परब यांच्याकडे होता. मंगळवारी सत्तरीतील सरपंचांनी वाळपई उपजिल्हाधिकारी परब यांना निवेदन सादर करत, सत्तरीत आरजीच्या पदयात्रेला परवानगी न देण्याची मागणी केली होती.
पंचायतींकडून आक्षेप
नगरगाव : रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीच्या ठाणे सत्तरी येथून सुरु झालेल्या म्हादई संदर्भातील जागृती पदयात्रेस उपजिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली आहे. काल नाट्यमय घडामोडींमध्ये सत्तरी तालुक्यातील सर्व पंचायत सदस्य आणि वाळपई नगरपालिकेने या पदयात्रेला विरोध दर्शविला होता. तसेच आक्षेप नोंदविणारी निवेदने दिली होती. त्यामुळे जर पदयात्रा चालू राहिली असती, तर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून उपजिल्हाधिकारी यांनी सादर केलेला परवानगी अर्ज नाकारून उपजिल्हाधिकाऱ्यांनी पदयात्रा काढण्यास मज्जाव केला आहे.
या संदर्भात माहिती देताना नगरगाव सरपंच संध्या खाडिलकर यांना सांगितले की, म्हादई संदर्भातील पदयात्रा सत्तरी येथून निघाली होती. त्याच्यामुळे येथील लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन वादावादी झाली असती. संपूर्ण सत्तरी तालुका हा शांततामय तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. आमची ही शांतता भंग करायची नाही. म्हादई संदर्भात सत्तरीची जनता पूर्णपणे जागरूक आहे. म्हादई संदर्भातील प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. सरकारची न्यायालयीन लढाई लढतच आहे. अशा पदयात्रा काढून त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणूनच सर्व पंचायतींनी या पदयात्रेच्या विरोधात उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"