टायगर जिंदा है...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2025 08:23 IST2025-01-03T08:22:10+5:302025-01-03T08:23:14+5:30
मनोज परब यांनी १ जानेवारी रोजी 'टायगर जिंदा है' हेच जणू दाखवून दिले.

टायगर जिंदा है...
राजकीय पक्षांनी लहरी असून चालत नाही. सातत्याने सक्रिय राहावे लागते. निवडणुका संपल्या की आपले काम झाले, असा विचार पूर्वी काँग्रेस पक्ष करत होता. गोव्यातील काँग्रेस पक्ष अलीकडे निवडणुका नसल्या तरी आंदोलने करतो. गोव्यात क्रांतीची भाषा करून अनेक मंत्री, आमदारांना पूर्वी घाम फोडलेला आरजी पक्ष मात्र गेले काही महिने निस्तेज बनून राहिला. सर्व चळवळींपासून आरजीने स्वतःला दूर ठेवले. विशेषतः या पक्षाचे प्रमुख नेते मनोज परब यांनी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर गोमंतकीयांना गुडबायच केले होते. त्यांनी गोव्यातील कोणत्याच विषयावर प्रतिक्रिया दिली नव्हती किंवा ते कुठेच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नव्हते. रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्ष निष्क्रिय बनलाय, असा लोकांचा समज झाला होता. अनेकांना त्यामुळे आपला अपेक्षाभंग झाला, असेदेखील वाटले होते. 'एका कापडान बायल म्हातारी जायना' अशी कोंकणीत म्हण आहे. आरजी पक्षाने लोकसभा निवडणुकीतील निकाल अनुभवला आणि आता सारे काही संपले अशा पद्धतीनेच हा पक्ष कोमात गेला, असे गोंयकारांना वाटत होते. लंडनमधील गोंयकारांची फेसबुकी बडबडदेखील त्यामुळे बंद झाली होती. मात्र, मनोज परब यांनी १ जानेवारी रोजी 'टायगर जिंदा है' हेच जणू दाखवून दिले.
'लेट्स रिव्होल्युशनाइज २०२५' असा मेसेज परब यांनी अनेकांना पाठवला. शिवाय फेसबुकवरही तसा संदेश टाकून नव्याने आरजीच्या युवा कार्यकर्त्यांचा उत्साह जागवण्याचा प्रयत्न केला. अनेक नेटिझन्सनी मनोज परब यांच्या संदेशाचे स्वागत केले. आम्ही याचसाठी थांबलो होतो, आता नव्याने काम करूया, असे आरजीच्या पाठीराख्यांनी म्हटले आहे. अर्थात यापुढील कोणतीच कृती योजना परब यांनी अजून जाहीर केलेली नाही.
लोकसभा निवडणुकीत आरजीकडे पैसा नव्हता. शिवाय २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी आरजीवाल्यांमध्ये जो उत्साह होता, तो नंतर कायम राहिला नव्हता. आरजीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसणार, असे लोक म्हणत होते. त्या पक्षात फूट पाडण्याचे, कार्यकर्ते फोडण्याचे प्रयत्नही अन्य राजकीय पक्षांनी केले होते. शिवाय आरजीमधील काही जणांची बदनामी करण्याचेही छुपे प्रयत्न झाले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच आरजी जणू भूमिगत झाला होता. मनोज परब अंडरग्राऊंड गेले आहेत, अशी चर्चाही रंगली होती. परब आरजीचे प्रमुखपद सोडतील, अशीही चर्चा होती. आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी मात्र गेले काही दिवस आपल्यापरीने आरजीचे अस्तित्व दाखवून देण्याचा थोडा प्रयत्न केला. बोरकर सांतआंद्रे मतदारसंघात सक्रिय आहेत. शिवाय ते स्वतः अन्य काही विरोधी राजकारण्यांप्रमाणे सेटिंगचे राजकारण करत नाहीत, असे म्हणण्यास वाव आहे.
आरजी लोकसभा निवडणुकीवेळी इंडिया आघाडीसोबत राहिला नाही. आरजीने स्वतःची वेगळी वाट धरली आहे. आता यापुढेही तीच वाट कायम ठेवली जाते की नाही, हे पाहावे लागेल. मात्र, आरजी भाजपसाठी सॉफ्ट आहे किंवा ती भाजपची बी टीम आहे, असा प्रचार काँग्रेसवाल्यांनी वारंवार केला आहे. आरजीने लोकसभा निवडणुकीवेळी स्वतंत्र उमेदवार देऊनही दक्षिण गोव्यात काँग्रेसचा उमेदवार जिंकला. यामुळे दक्षिण गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह आहे.
दक्षिणेतील खिस्ती मतदार आपल्या बाजूने आहेत, असे आता काँग्रेसला वाटते. सेक्युलर मतांमध्ये फूट पडली तर त्याचा लाभ भाजपला मिळतो. ख्रिस्ती मतदारांना ती फूट नको आहे, असे सासष्टीतील अनेक काँग्रेस पदाधिकारी मानतात. अर्थात याबाबत अधिक चर्चा व विचारमंथन होण्याची गरज आहे. शेवटी लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणूक या दोन्हीची गणिते पूर्णपणे वेगळी असतात.
२०२७ सालच्या विधानसभा निवडणुकीत आरजीला स्वतःचा प्रभाव दाखवायचा असेल तर अगोदर लहरी स्वभाव सोडून द्यावा लागेल. एक लढाई हरल्यानंतर सर्व काही संपले, अशी भावना आरजीवाल्यांनी ठेवली तर तो पक्ष वाढूच शकणार नाही. आरजीला सदस्य नोंदणी मोहीम राबवावी लागेल. शिवाय नवे कार्यकर्ते व नव्या नेत्यांना पक्षात आणावेच लागेल. केवळ गोंयकारपणाचे हितरक्षण करण्याच्या वल्गना व आंदोलने करून पक्ष वाढत नसतो. महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या मनसेलाही ते कळून आले आहेच.