गोव्यात मतदारयाद्यांचा ४ नोव्हेंबरपासून फेरआढावा, अंतिम मतदार यादी ७ फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 07:58 IST2025-10-28T07:58:55+5:302025-10-28T07:58:55+5:30
या देशव्यापी मतदार यादी पडताळणी आणि अद्ययावतीकरण प्रक्रियेचा भाग म्हणून गोव्याचे निवडणूक अधिकारी पुढील महिन्यात गणना प्रक्रिया सुरू करतील.

गोव्यात मतदारयाद्यांचा ४ नोव्हेंबरपासून फेरआढावा, अंतिम मतदार यादी ७ फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी/नवी दिल्ली : गोव्यात अन्य अकरा राज्यांसह मतदार याद्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील फेरआढाव्याची विशेष व्यापक मोहीम येत्या ४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांनी माहिती दिली. १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू होईल. ज्या राज्यांमध्ये एसआयआर घेण्यात येईल त्या सर्व मतदार याद्या काल रात्री १२ वाजल्यापासून गोठवल्या.
मसुदा मतदार यादी ९ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित होणार आहे, तर अंतिम मतदार यादी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाईल. या देशव्यापी मतदार यादी पडताळणी आणि अद्ययावतीकरण प्रक्रियेचा भाग म्हणून गोव्याचे निवडणूक अधिकारी पुढील महिन्यात गणना प्रक्रिया सुरू करतील. दुसऱ्या टप्प्यात सहभागी होणारी इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अंदमान आणि निकोबार बेटे, छत्तीसगढ, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुडुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे.
या प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात ५१ कोटी मतदारांचा समावेश असेल. ही प्रक्रिया ४ नोव्हेंबरपासून सुरू होईल. मसुदा याद्या ९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होतील. ७ फेब्रुवारीला अंतिम यादी प्रकाशित केली जाईल.
मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
गोव्यासह १२ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधील मतदार याद्यांच्या विशेष व्यापक आढाव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वागत केले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, स्वच्छ आणि पारदर्शक मतदार यादी ही लोकशाहीचा पाया आहे. आम्ही नेहमीच अचूक, अद्ययावत याद्यांसाठी उभे राहिलो आहोत. ही मोहीम विसंगती ओळखण्यास आणि यादी दुरुस्त करण्यास, अपात्र नोंदी (कोणत्याही बेकायदेशीर मतदार किंवा बेकायदेशीर स्थलांतरितांच्या नावांसह) काढून टाकण्यास आणि निवडणूक प्रक्रियेची अखंडता अधिक मजबूत करण्यास मदत करील."