महसूल घटला, साधनसुविधांना खो
By Admin | Updated: December 27, 2014 01:11 IST2014-12-27T00:58:22+5:302014-12-27T01:11:37+5:30
मुख्यमंत्र्यांची कबुली : एक हजार कोटींचे पॅकेज तातडीने देण्याची केंद्र सरकारकडे मागणी

महसूल घटला, साधनसुविधांना खो
पणजी : राज्यातील खनिज व्यवसाय बंदच असल्याने सरकारचा एकूण १ हजार ४०० कोटी रुपयांचा महसूल घटला. याचा परिणाम राज्यातील साधनसुविधा निर्माणावर होत आहे, असा मुद्दा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासमोर मांडला. तसेच गोव्यासाठी एक हजार कोटींचे पॅकेज तातडीने दिले जावे, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.
केंद्रीय अर्थसंकल्पाकडून सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या कोणत्या अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांनी शुक्रवारी दिल्लीत बैठक बोलावली होती. दुपारपासून सायंकाळपर्यंत ही बैठक चालली. बैठकीत पार्सेकर यांनी गोवा सरकारच्या अपेक्षा मांडल्या. गोव्यासाठी महसूल कमी पडत असल्याने साधनसुविधा उभारणे कठीण जाते. आम्ही यापूर्वी जाहीर केलेल्या कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबवत आहोत; पण साधनसुविधांवर परिणाम होत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
केंद्रीय योजना नकोत
गोव्यात केंद्र सरकारच्या नव्या योजना अनुकूल नाहीत. त्याऐवजी आम्ही जे प्रकल्प उभे करू त्यास केंद्राने अधिक निधी द्यावा, असा मुद्दा जेटली यांच्यासमोर मांडला आहे. खनिज निर्यातीवरील तीस टक्के कर हा गोव्याला परवडत नाही; कारण गोव्याचे खनिज कमी प्रतीचे आहे. त्यामुळे कमी प्रतीच्या खनिजावरील निर्यात कर काढून टाकला जावा, अशी मागणी केल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)