गोव्यात नव्या ट्रॉलर्सवर निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2018 02:13 PM2018-07-22T14:13:25+5:302018-07-22T14:41:21+5:30

गोव्यात फॉर्मेलिनयुक्त मासळीचा वाद चालू असताना नव्या ट्रॉलर्सच्या नोंदणीवर निर्बंध आले असून यापुढे एका व्यक्तीच्या नावावर केवळ दोनच ट्रॉलर्सची नोंदणी करता येणार आहे.

Restrictions on new trawlers in Goa | गोव्यात नव्या ट्रॉलर्सवर निर्बंध

गोव्यात नव्या ट्रॉलर्सवर निर्बंध

googlenewsNext

पणजी: गोव्यात फॉर्मेलिनयुक्त मासळीचा वाद चालू असताना नव्या ट्रॉलर्सच्या नोंदणीवर निर्बंध आले असून यापुढे एका व्यक्तीच्या नावावर केवळ दोनच ट्रॉलर्सची नोंदणी करता येणार आहे. त्यापेक्षा अधिक ट्रॉलर्स नोंदवता येणार नाहीत. राज्यात १०५ किलोमीटर अंतराच्या सागरी किनारपट्टीत तब्बल ११०४ ट्रोलर्स आहेत. या मच्छीमारांना सरकार देत असलेली सबसिडी कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. डिझेल तसेच बर्फ व अन्य बाबतीत सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीच्या तुलनेत बाजारात मासळी मात्र ग्राहकांना महागच खरेदी करावी लागते.

यावरून मच्छीमारी खातेही नाराज आहे. मच्छीमारी खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी गोव्यातील जनतेला स्वस्तात मासळी उपलब्ध करून देण्यासाठी मच्छीमारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणाही केलेली आहे. मासळीआयात करून माफक दरात गोव्यातील जनतेला पुरवण्याची मंत्र्यांची योजना होती. परंतु तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ तसेच अन्य राज्यांमधून आयात केल्या जाणाऱ्या फॉर्मेलिन हे घातक रसायन सापडल्याने खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या 15 दिवसांची मासळी आयात बंदी आहे. 
आयात मासळी खूप दिवस टिकावी यासाठी फॉर्मेलिन या घातक रसायनाचा वापर केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मासळी आयातीच्या योजनेवरही आता पाणी फिरले आहे.

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ बबन इंगोले यांच्या दाव्यानुसार १०५ किलोमीटर किनारपट्टीत १ हजाराहून जास्त ट्रॉलर्स हे प्रमाण दुप्पटीपेक्षा जास्त आहे. समुद्रातील मासे अशा पद्धतीने गाळून आणल्यास मासळी प्रजननांवर त्याचा विपरीत परिणाम होईल, अशी भीती शास्त्रज्ञांना आहे. राज्यात कुटबण, वास्को, मालिम, शापोरा, बेतुल अशा प्रमुख मच्छीमारी जेटी आहेत. यापैकी मालिम जेटी सर्वात मोठी असून मांडवी फिशरमन्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे तब्बल साडेतीनशे ट्रॉलर्स याठिकाणी आहेत. राज्यात ६१  दिवसांची मासेमारी बंदी सध्या लागू असून ही बंदी १ ऑगस्ट रोजी उठल्यानंतर ट्रॉलर्स मासेमारीसाठी समुद्रात जाणार आहेत. 

‎मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी हे ट्रॉलर्स सुरू झाल्यानंतर राज्यात मासळीची कोणतीही समस्या राहणार नाही, असा दावा करताना मासळी आयात करण्याची परिस्थितीही राज्यावर येणार नाही, असे म्हटले आहे. सध्या गोव्याचे मासळी बाजार आयात ठप्प झाल्याने ओस पडले आहेत. मांडवी, झुवारी, शापोरा आदी स्थानिक नद्यांमध्ये मिळणाऱ्या गावठी मासळीवरच लोक अवलंबून आहेत. या गावठी मासळीचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे मासळी खवय्ये गोमंतकीयांना आता १ ऑगस्ट प्रतीक्षा आहे. पण मांडवी फिशरमेन्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा मालिम येथील ट्रॉलर मालक सीताकांत परब यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सध्याचे हवामान पाहता १ ऑगस्टपासून पूर्ण क्षमतेने मासेमारी सुरू होणे तसे कठीणच आहे. गोव्याच्या ट्रोलर्सवर काम करणारे बहुतांश मच्छीमार ओडिशा, झारखंड, कर्नाटक राज्यातील असून मासेमारीबंदीच्या मधील सुट्टीनंतर ते विलंबाने करतात. १५ ऑगस्टनंतरच पूर्ण वेगाने मासेमारी सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Restrictions on new trawlers in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.