लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : एअर इंडियाने गोवा-लंडन गॅटविकविमानसेवा बंद केल्याने सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत चिंता व्यक्त केली. विमान बंद झाल्याने गोमंतकीयांची मोठी गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आणून ही सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली.
तानावडे यांनी राज्यसभेत शून्य प्रहराला हा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडन गॅटविकला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाची थेट उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. २१ जुलै २०२३ रोजी सुरू झालेली थेट नॉन-स्टॉप विमानसेवा गोव्याहून आठवड्यातून तीन दिवस चालत होती. गोमंतकीयांना याचा मोठा फायदा होत असे. गोव्याचे लंडनची संबंध केवळ पर्यटनापुरते मर्यादित नाहीत, तर ते सांस्कृतिक, आर्थिक आणि इतर बाबतीत विस्तारलेले आहेत.