गोव्याच्या एकमेव आमदाराकडून रिपोर्ट कार्ड सादर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 18:46 IST2019-12-28T18:46:17+5:302019-12-28T18:46:30+5:30
नियमितपणे रिपोर्ट कार्ड सादर करणारे खंवटे हे गोव्याचे एकमेव अपक्ष आमदार ठरले आहेत.

गोव्याच्या एकमेव आमदाराकडून रिपोर्ट कार्ड सादर
पणजी : माजी मंत्री व पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी गेल्या अडीच वर्षात पर्वरी मतदारसंघात कोणती कामे केली व किती आश्वासने पाळली. याबाबतचा सविस्तर अहवाल शनिवारी रिपोर्ट कार्डद्वारे जाहीर केला. आपण 2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यातून दिलेली 60 टक्के आश्वासने गेल्या अडीच वर्षात पाळली, असे खंवटे यांनी येथे सांगितले. नियमितपणे रिपोर्ट कार्ड सादर करणारे खंवटे हे गोव्याचे एकमेव अपक्ष आमदार ठरले आहेत.
जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, पंच सदस्यांसोबत खंवटे यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. आपण 2012 साली प्रथम आमदार झालो व 2014 मध्ये प्रथम रिपोर्ट कार्ड जाहीर केले. मग आपण 2016 साली पुन्हा आमदार म्हणून प्रगती अहवाल जनतेसमोर ठेवला. 2017 च्या निवडणुकीवेळी लोकांनी मला पुन्हा निवडून दिले. कारण मी दिलेली आश्वासने पाळतो व विकास कामे करून दाखवतो.
नियमितपणे आपण लोकांसमोर रिपोर्ट कार्ड ठेवतो. मंत्री म्हणून काम करताना पूर्ण राज्यात आपण आपल्या खात्यामार्फत कामे मार्गी लावली व आमदार या नात्याने पर्वरी मतदारसंघात अनेक विकास कामे करून दाखवली. अजून काही कामे सुरू आहेत. उर्वरित चाळीस टक्के आश्वासने पुढील अडिच वर्षात पूर्ण होतील, असे खंवटे म्हणाले.
मी करून दाखवलेल्या विकास कामांमध्ये जिल्हा पंचायत सदस्य तसेच सरपंच, पंच, ग्रामपंचायतींचेही योगदान आहे. 15-20 एमएलडीचा पाणी प्रक्रिया प्रकल्प आम्ही पर्वरीत आणला. अनेक उप आरोग्य केंद्रे सुरू केली. चांगली पंचायत घरे बांधली. स्वच्छ व हरित पर्वरीचे स्वप्न पूर्णत्वास आणण्याची प्रक्रिया सुरू केली. राष्ट्रीय वादळ आपत्ती हाताळणी व्यवस्था पर्वरीत आणली. अनेक उद्याने विकसित केली. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी नेटवर्क उभे करण्याचे काम मार्गी लावले, असे खंवटे यांनी सांगितले.
2008 साली आम्ही पर्वरी युवा कल्याण ट्रस्ट स्थापन केला होता. यंदा त्या ट्रस्टची दहा वर्षे आम्ही साजरी करणार आहोत. पर्वरीत आम्ही शेतक-यांचे क्लब स्थापन केले व शेती व्यवसाय वाढवला. 12 जानेवारीला पर्वरीत कृषी मेळावा आयोजित करू, असे खंवटे यांनी सांगितले.