माझे घर योजनेला विरोध करणाऱ्यांची आठवण ठेवा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 08:15 IST2025-10-30T08:14:57+5:302025-10-30T08:15:20+5:30
काणकोणात माझे घर योजनेच्या अर्जाचे वितरण

माझे घर योजनेला विरोध करणाऱ्यांची आठवण ठेवा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण : माझे घर योजनेला कोण-कोण विरोध करतात ते सांगा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काणकोणातील जमलेल्या नागरिकांना प्रश्न केला असता उपस्थितांनी काँग्रेस, रिव्होल्युशनरी गोवन्स, गोवा फॉरवर्ड व आम आदमी पार्टीचे नेते असे सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी 'माझे घर' योजनेला विरोध करणाऱ्यांची आठवण ठेवा, असे सांगितले.
काणकोण रवींद्र भवनमध्ये आयोजित 'माझे घर' योजनेचे अर्ज वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी काणकोणचे आमदार तथा कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर, नगराध्यक्ष लक्ष्मण पागी, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना किल्टस, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश गावकर, उपजिल्हाधिकारी प्रतापराव नाईक गावकर, विविध पंचायतीचे सरपंच सविता तवडकर, नीलेश पागी, वृंदा वेळीप, सेजल गावकर, निशा च्यारी, जि. पं सदस्य शोभना वेळीप, शाणू वेळीप व इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दीपप्रज्वलित करून माझे घर योजनेच्या अर्ज वाटप सोहळ्याचा शुभारंभ केला.
मुख्यमंत्री म्हणाले की, आम्हाला कुणाचेच घर मोडायचे नाही. भाजप सरकार हे सामान्य जनतेचे आहे. येथे जात, धर्म जात नाही. सरकारी अधिकाऱ्यांना ग्रामस्थांना जे दाखले हवे आहेत ते लवकर देण्याचे आदेश दिले. यावेळी कोमुनिदाद जमिनीतील, २० कलमी कार्यक्रम अंतर्गत घरे दिलेली घरे अशा नागरिकांना प्रमाणपत्रे दिली.
'त्या' घरांना मिळणार संरक्षण
गोव्यातील ९९ टक्के लोकांजवळ घरांची कागदपत्रे नाहीत. माझे घर योजनेमुळे अशा नागरिकांना दिलासा मिळेल, असे श्री. तवडकर यांनी सांगितले. आगोंद येथे कोमिनिदाद जागेतील घरे मोडण्याची नोटीस आली होती, अशावेळी ते लोक संभ्रतात पडले होते. आता या योजनेमुळे त्यांना संरक्षण मिळणार आहे, असे श्री तवडकर यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांना संयुक्त मामलेदार गायत्री देसाई, दिप्ती फळदेसाई रणजिता, प्रिया भिडे, श्रेया कामत, प्रतीक्षा नामशिकर यांनी पुष्पगुच्छ प्रदान केले. सूत्रसंचालन शिरीष पै यांनी केले.