अंगणवाडी सेविकांना दिलासा; निवृत्तीचे वय ६० वरून ६२ वर, अधिसूचना जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 12:09 IST2025-07-11T12:08:32+5:302025-07-11T12:09:10+5:30
स्वेच्छानिवृत्तीसाठी पाच लाख रुपयांपर्यंत लाभ

अंगणवाडी सेविकांना दिलासा; निवृत्तीचे वय ६० वरून ६२ वर, अधिसूचना जारी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : महिला आणि बालविकास खात्याने अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे निवृत्ती वय वाढवून ६२ केले आहे. तर स्वेच्छा निवृत्ती घेणाऱ्या मदतनिसांना तीन लाख रुपये तर सेविकांना पाच लाख रुपये लाभ जाहीर केला. यासंबंधीची अधिसूचना काल काढण्यात आली. १ मे २०२४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने ही तरतूद लागू झाली आहे.
राज्यात सुमारे १२६२ अंगणवाडी केंद्रांवर सेविका व मदतनीस मिळून २५०० महिला कर्मचारी आहेत. या सर्वांना हा लाभ होणार आहे. स्वेच्छा निवृत्तीबरोबरच वैद्यकीय तसेच इतर लाभदेण्याच्या तरतुदीदेखील समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक पुरस्कार योजनेत सुधारणा आदिवासी कल्याण खात्याने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक पुरस्कार योजनेत सुधारणा केली आहे. दहावी आणि बारावी परीक्षेतील पहिल्या पाच क्रमांकांवर आलेल्या विद्यार्थ्यांना सार्वजनिक सत्कार समारंभ आयोजित करून प्रत्येकी २४ हजार रुपये पुरस्कार स्वरुपात दिले जातील. बारावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक शाखांमधून प्रत्येकी पहिल्या पाच क्रमांकातील विद्यार्थी पात्र असतील. अधिसूचनेत नमूद केल्यानुसार याशिवाय ५० ते ७५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना ६ हजार ते १८ हजार रुपयांपर्यंतचे पुरस्कार मिळू शकतात.
चालू शैक्षणिक वर्षापासून ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेवर आधारित पुरस्कारांसाठी ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, असेच विद्यार्थी पात्र आहेत. ५० ते ५९.९९ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये पुरस्कार म्हणून दिले जातील. ६० ते ६९.९९ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ९,६०० रुपये, ७० ते ७४.९९ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ हजार रुपये तर ७५ टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना एकदाच १८ हजार रुपये पुरस्कार म्हणून दिले जातील.
विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज करावे लागतील. अर्जदारांनी नोंदणी केल्यानंतर सर्व बाबतीत पूर्ण केलेला अर्ज पोर्टलवर सादर करावा लागेल आणि संस्थेच्या नोडल अधिकाऱ्याने तपासणीनंतर त्याच्या शिफारशीनंतरच आदिवासी कल्याण संचालनालयाकडे पाठवावा लागेल. प्रत्येक नवीन अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा फोटो, सक्षम प्राधिकरणाने दिलेले अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाने दिलेला उत्पन्नाचा दाखला जोडावा लागेल. दहावी, बारावीचे मार्कशीट, बैंक पासबुक, आधार कार्ड व चालू शैक्षणिक वर्ष प्रवेशासाठी भरलेल्या शुल्काची पावती द्यावी लागेल.
३० एप्रिल २०२४ रोजी व त्यानंतर निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे निवृत्तीचे वय ६२ वर्षे असेल. ६० वर्षे वय झाल्यानंतर सरकारी वैद्यकीय रुग्णालयातून वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागेल. निवृत्तीचे वय गाठणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा जर जन्म महिना जानेवारी ते एप्रिल असेल तर त्या ३० एप्रिल रोजी निवृत्त होतील.
जन्म महिना मे ते डिसेंबर असेल तर निवृत्ती सलग वर्षाच्या ३० एप्रिल रोजी असेल. स्वेच्छा निवृत्त होण्यासाठी तीन महिने आधी कल्पना द्यावी लागेल. अन्य एक अधिसूचनेद्वारे गृह खात्याने बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा, १९६७ अंतर्गत कायदा सचिवांना स्वतंत्र पुनरावलोकन प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे.
लघु खनिज सवलत नियमात सुधारणा
खाण खात्याने गोवा लघु खनिज सवलत नियम, १९८५ मध्ये सुधारणा केली आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) यांच्याशी शब्दावली संरेखित केली असून, जुन्या भादंसं आणि फौजदारी संदर्भाची जागा घेतली.
पत्रकारांना फॅमिली पेन्शन
दरम्यान, माहिती आणि प्रसिद्धी खात्याने राज्यात कार्यरत पत्रकारांसाठीच्या कल्याण योजनेत सुधारणा केली असून, १० हजार रुपये पेन्शन (फॅमिली पेन्शन) आता पत्रकाराच्या निधनानंतर संबंधिताची पत्नी किंवा पतीलाही मिळणार आहे.