खाणींकडून १२0 कोटी वसूल
By Admin | Updated: December 29, 2014 01:48 IST2014-12-29T01:45:07+5:302014-12-29T01:48:37+5:30
वाहतूक अधिभार : एकूण ३५0 कोटी येणे

खाणींकडून १२0 कोटी वसूल
पणजी : खनिजावरील वाहतूक अधिभाराचे ३५0 कोटी रुपये वसूल करण्यासाठी वाहतूक खात्याने खाण कंपन्यांना डिमांड नोटिसा पाठवल्यानंतर आतापर्यंत १२0 कोटी रुपये तिजोरीत आले आहेत.
वाहतूक खात्याचे संचालक अरुण देसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली. खनिज वाहतुकीवरील अधिभार एकाही खाण कंपनीने भरला नव्हता. गेल्या पाच वर्षांच्या अधिभाराची थकबाकी होती.
ही थकबाकी वसूल केल्याशिवाय परवाने देऊ नयेत, असे सरकारने वाहतूक खात्याला दिलेले आहेत. प्राप्त माहितीनुसार लिज नूतनीकरण झालेल्या १३ खाणींकडून अधिभाराचे आणखी ३0 कोटी रुपये येणे आहेत.
देसाई यांना विचारले असता ते म्हणाले की, अधिभाराची थकबाकी भरल्याशिवाय लिजधारक खनिज वाहतूक करूच शकणार नाहीत. एकूण १0३ लिजांच्या बाबतीत वाहतूक अधिभार थकबाकी सरकारला येणे बाकी आहे.
स्टॅम्प ड्युटी भरलेल्या २७ खाणींपैकी आतापर्यंत १३ खाणींच्या लिजांचे नूतनीकरण झालेले आहे. नजीकच्या काळात आणखी काही खाणींचे लिज नूतनीकरणही होईल. आगामी काळात ज्या लिजांचे नूतनीकरण होईल त्या सर्वांना खनिज वाहतुकीचा थकित अधिभार भरावा लागेल.
दरम्यान, १३ खाणींचे लिज नूतनीकरण झालेले असले तरी प्रत्यक्षात अजून खाणी सुरू झालेल्या नाहीत त्याला आणखी काही कालावधी लागेल, असे असे खाण खात्यातील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. बेकायदा खाणींच्या बाबतीत न्यायमूर्ती शहा आयोगाने दिलेला अहवाल, विधानसभा सार्वजनिक लेखा समिती तसेच केंद्रीय उच्चाधिकार समितीने अहवालात जे निष्कर्ष काढले आहेत त्याची पडताळणी करूनच लिज नूतनीकरण केले जाणार आहे. (प्रतिनिधी)