'त्या'तीन मुद्द्यांवर कोणाशीही युतीस तयारः आरजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 12:27 IST2025-10-04T12:27:03+5:302025-10-04T12:27:34+5:30
गोव्यात गोमंतकीयांसाठी आता काहीच राहिलेले नाही.

'त्या'तीन मुद्द्यांवर कोणाशीही युतीस तयारः आरजी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पोगो, म्हादई आणि जमीन संरक्षण या तीन विषयांवर जर कुणाची सहमती असेल तर आम्ही युती करण्यास तयार आहोत, मग ते गोवा फॉरवर्ड असो, काँग्रेस असो किंवा आप असो. सध्या गोवा फॉरवर्डला आमचे विषय पटत आहे, त्यामुळे भविष्यात आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन याबाबत विचार करु शकतो. आता सर्वानाच कळून चूकले की भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर एक फोर्सची गरज आहे, जी केवळ युतीमध्ये आहे, असे मत रिव्होल्यूशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी एका स्थानिक वृत्त वाहिनीशी बोलताना व्यक्त केले.
गोव्यात गोमंतकीयांसाठी आता काहीच राहिलेले नाही. गोवा गोमंतकीयांचा कमी आणि परप्रांतीयांचा जास्त झाला आहे. सरकारलाही हे कळून चूकले आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीत मते मिळवण्यासाठी त्यांनी माझे घर योजना आणली. पण या योजने अंतर्गत देखील ८० टक्के परप्रांतीय आपली बेकायदेशीर घरे कायदेशीर करुन घेणार आहे. हे गोमंतकीयांनाही कळालेले आहे, असेही परब म्हणाले.
आम्ही राज्यभर फिरत आहेत. माझे घर योजनेचा लाभ केवळ परप्रांतीयांनाच होणार आहे. याचे कारण म्हणजे जे गोमंतकीय कोमुनिदाद किंवा इतर बेकायदेशीर जागांवर राहत होते त्यांनी कधीच सरकार आमची घरे कधीही मोडतील या भितीने पक्की घरे बांधली नाही. पण परप्रांतीय बेधडक घरे बांधली आणि यांचीच घरे सरकार कायदेशीर करणार आहे. याबाबत आम्ही लोकांना जागृत करण्यासाठी तळागाळात काम सुरु केले आहे, असेही परब यावेळी बोलताना म्हणाले.