मालवणात सापडला प्रवाळावर वाढणारा दुर्मीळ स्पंज, एनआयओ शास्रज्ञांचे संशोधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 19:31 IST2020-03-20T19:31:19+5:302020-03-20T19:31:38+5:30
जागतिक पातळीवर टेक्सोनोमिस्ट अॅप्रिसिएशनदिनी म्हणजेच १९ रोजी ‘वोराम’ अधिकारिणीने याची घोषणा केली.

मालवणात सापडला प्रवाळावर वाढणारा दुर्मीळ स्पंज, एनआयओ शास्रज्ञांचे संशोधन
- किशोर कुबल
पणजी : समुद्रातील वनस्पती आणि प्राणी यांच्या दुर्मीळ प्रजातींपैकी पहिल्या दहामध्ये स्थान मिळवणारा क्लिओना थॉमसी मोटे हा नवीन प्रकारचा स्पंज मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ प्रवाळावर वाढताना आढळून आला. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे ज्येष्ठ निवृत्र शास्रज्ञ बबन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली या दुर्मीळ स्पंजवर गेली दोन वर्षे संशोधन झाले.
इंगोले यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार या स्पंजवर पूर्ण अभ्यास करुन जागतिक पातळीवर यासंबंधीची घोषणाही झालेली आहे. हा स्पंज प्रवाळावर वाढतो. जागतिक तापमानवाढ प्रवाळांसाठी मारक आहे परंतु या दुर्मीळ स्पंजसाठी मात्र पूरक आहे. हा दुर्मीळ स्पंज प्रवाळाबरोबरच राहतो आणि प्रवाळालाच आपले भक्ष्य बनवितो, असे इंगोले यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘तापमानवाढीमुळे समुद्रातील वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवाळांना जगणे मुश्कील बनते अशावेळी हा स्पंज त्यांना आपले भक्ष्य बनवितो. तापमानवाढीमुळे फार मोठे बदल समुद्रातील वनस्पती आणि प्राणी संपत्तीवर होत आहेत.
इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली या संशोधनात भाग घेतलेले जागतिक ख्यातीच भारतीय स्पंजतज्ञ डॉ. पी. ए. थॉमस, क्लिओना थॉमसी तसेच त्यांच्याकडे पीएचडी करणारे विद्यार्थी संभाजी मोटे यांचे नाव या दुर्मीळ स्पंजला देण्यात आले आहे. जागतिक पातळीवर टेक्सोनोमिस्ट अॅप्रिसिएशनदिनी म्हणजेच १९ रोजी ‘वोराम’ अधिकारिणीने याची घोषणा केली.