लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'भाजपात आता मिक्स भाजी आणि खतखते झालेले आहे. निष्ठावान कार्यकर्ते शोधूनही सापडेनासे झाले आहेत,' असे विधान करीत सभापती रमेश तवडकर यांनी इतर पक्षांमधून नेते, कार्यकर्ते आयात करण्याच्या पक्षाच्या धोरणावर हल्लाबोल केला. 'श्रमधाम' उपक्रमासंबंधी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही खंत व्यक्त केली.
सभापती तवडकर म्हणाले की, 'पर्रीकर एवढ्या लवकर आमच्यातून जातील असे कोणालाही वाटले नव्हते. हयात असते तर आणखी दहा वर्षे तरी सक्रिय राजकारणात राहिले असते. पर्रीकर यांना मानणारा मोठा वर्ग होता. पेडणे ते काणकोणपर्यंत त्यांच्याशी कार्यकर्ते एकनिष्ठ होते. निष्पाप भावनेने कार्यकर्ते काम करायचे. कालांतराने राजकीय बदल झाले आणि आता तर मिक्स भाजी आणि खतखते झाले आहे. ते निष्ठावान कार्यकर्ते कुठे आहेत, हे शोधूनही सापडत नाही. 'समस्या अनेक आहेत. त्यावर तोडगा काढायचा असेल तर चिंतन व्हायला हवे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. खरेतर हीच आमची शिदोरी आहे. सत्ता असल्याने कार्यकर्त्यांची कामे व्हायला हवीत. त्यांच्या अडचणी दूर व्हायला हव्यात.'
दरम्यान, तवडकर यांनी काणकोणमध्ये पक्षाने तिकीट नाकारल्यावर २०१७ ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. परंतु २०२२च्या निवडणुकीआधी ते भाजपात आले. ते भाजपच्या तिकिटावर निवडून येऊन नंतर सभापती बनले.
यापूर्वीही खळबळजनक विधान
दरम्यान, तवडकर यांनी अलीकडेच मंत्रिमंडळ फेररचनेसंबंधी विधान करून अशीच खळबळ उडवून दिली होती. पंधरा दिवसांच्या आत मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार असून नीलेश काब्राल, दिगंबर कामत व इतरांची नावे चर्चेत मीडियामध्ये असल्याचे ते म्हणाले होते. आमदार, मंत्री तसेच भाजपमध्येही यामुळे चलबिचल झाली होती. परंतु, नंतर पत्रकारांनी विचारले असता मंत्रिमंडळ फेररचनेचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याचे नमूद करून आपण यासंबंधी अधिक भाष्य करू इच्छित नसल्याचे ते म्हणाले होते.
पर्रीकरांनंतर मी तवडकरांना मानतो : दयानंद सोपटे
कार्यक्रमास उपस्थित मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे म्हणाले की, 'पर्रीकरांनंतर मी तवडकर यांना मानतो. माझ्या मते पर्रीकरांनंतर पहिले नाव तवडकरांचेच येते. श्रमधाम संकल्पनेंतर्गत त्यांनी आम्हाला काम करण्यासाठी प्रवृत्त केले. दोन वर्षांत गरीब, गरजूंना चाळीस घरे बांधून दिली. आता घरांची संख्या शंभरावर नेण्यासाठी तवडकरांचे हात आम्हाला बळकट करावे लागतील. तवडकर यांनी स्वतः गरिबी भोगली आहे, त्यामुळे गरिबांच्या यातना त्यांना ठाऊक आहेत. ते स्वतः हातात फावडे, कुदळ घेऊन वावरतात. श्रमदानासाठी भावना जागृत करण्याचे मोठे काम ते करत आहेत. मी यापूर्वी त्यांच्या निवडणुकीसाठी खोतीगावसारख्या भागात डोंगर चढून प्रचार केला. यावेळी तवडकरांना मोठ्या प्रमाणात लोक मानतात हे मला त्यावेळी दिसून आले.
निष्ठावान कार्यकर्ते, नेत्यांवर अन्याय झाला
आता भाजपमधील 'मिक्स भाजी आणि खतखते' यासंबंधीचे त्यांचे विधान चर्चेत आले आहे. गेल्या काही वर्षांत खासकरून फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अनेक आमदार व त्यांचे कार्यकर्ते आयात केले. जुलै २०१९ मध्ये व त्यानंतर सप्टेंबर २०२२ मध्ये काँग्रेसचे अनुक्रमे दहा व आठ आमदार फोडले. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते, नेत्यांवर यामुळे अन्याय झाला. तवडकर यांनी वरील कार्यक्रमात मनातील हे शल्य व्यक्त केल्याचे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
प्रदेशाध्यक्ष म्हणतात, मला काही ठाऊक नाही
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना 'लोकमत' प्रतिनिधीने तवडकरांच्या या विधानाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, 'मी संपूर्ण दिवस कार्यक्रमात व्यस्त होतो. सायंकाळी उशिरापर्यंत साखळीत होतो. तवडकर यांच्या या विधानाबद्दल मला काही माहीत नाही. त्याबद्दल मी जाणून घेईन व नंतरच भाष्य करीन.'