‘राजभवनला जुने वैभव मिळवून दिले’

By Admin | Updated: July 6, 2014 00:46 IST2014-07-06T00:44:48+5:302014-07-06T00:46:36+5:30

राजू नायक/सद्गुरू पाटील ल्ल काबो, राजभवन मी राज्यपाल बनून गोव्यातील राजभवनवर आलो तेव्हाच राजभवन इमारतीच्या संवर्धनाचे काम सुरू होते.

'Raj Bhavan got old glory' | ‘राजभवनला जुने वैभव मिळवून दिले’

‘राजभवनला जुने वैभव मिळवून दिले’

राजू नायक/सद्गुरू पाटील ल्ल
काबो, राजभवन
मी राज्यपाल बनून गोव्यातील राजभवनवर आलो तेव्हाच राजभवन इमारतीच्या संवर्धनाचे काम सुरू होते. त्यामुळे अतिशय योग्यवेळी मी राजभवनवर पोहोचलो. त्यानंतर मी राजभवनला जुने वैभव मिळवून देण्यासाठी बराच वेळ दिला. त्यादृष्टीने मी बरेच योगदान दिले, अशा शब्दांत राज्यपाल भारत वीर वांच्छू यांनी शनिवारी ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला.
मी आयुष्यात पत्रकारांपासून कायम दूर राहिलो; कारण माझा पूर्वीचा जॉब हा हायप्रोफाईल होता आणि माझा स्वभाव हा पूर्णत: खासगी स्वरूपाचा आहे. मी कधी प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या नाहीत. मी आता देत असलेली (म्हणजे शनिवारी लोकमतला दिलेली) ही माझ्या कारकिर्दीतील दुसरी मुलाखत आहे, राज्यपाल पुढे सांगू लागले.
वांच्छू यांनी राज्यपालपदाचा शुक्रवारी राजीनामा दिला आहे. सोमवारी ते गोव्याचा निरोप घेत आहेत. राजभवनवर जिथे नूतनीकरणाचे व सौंदर्र्यीकरणाचे काम करण्यात आले आहे, त्या जागेवर उभे राहून व फिरून राज्यपालांनी ‘लोकमत’ला बरीच माहिती दिली. स्वत: उभे राहून छायाचित्रेही काढू दिली. मी मूळचा काश्मिरी सारस्वत आहे. स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कुटुंबाप्रमाणेच. मात्र, आम्ही काश्मीर चारशे वर्षांपूर्वी सोडले. मी काश्मिरी बोलतही नाही. हिंदी व इंग्रजीच बोलतो. गोव्यात मी राज्यपाल म्हणून साधेपणानेच राहिलो. त्यामागे माझा कोणता वेगळा हेतू नव्हता. मी गोव्यातील किनाऱ्यांवर फिरलो. शॉपिंग केले. चित्रपट पाहिले. आजच्या काळात ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्या सर्वांनीच जुनी सरंजामशाही सोडून द्यायला हवी. मी राज्यपाल म्हणून अतिशय स्वतंत्र विचाराने काम केले. घटनेनुसार राज्यपालांना जे अधिकार आहेत, तेवढ्याच अधिकार क्षेत्रात राहून मी काम केले. अतिउत्साहीपणावर माझा विश्वास नाही, राज्यपाल सांगू लागले.
४६० वर्षांची चॅपेल सुधारली
राजभवनची इमारत उभी राहण्यापूर्वी सर्वात पहिली काबो-दोनापावल येथे चॅपेल बांधली गेली. अरबी समुद्राच्या दिशेने तोंड करून राजभवन इमारतीच्या मागे ही चॅपेल आहे. या चॅपेलला ४६० वर्षांचा इतिहास आहे, राज्यपाल पुढे सांगू लागले. चॅपेलमध्ये राज्यपालांनी फिरून दाखवले. या चॅपेलमध्ये फ्युमिंग करून स्वच्छता केली गेली, तेव्हा त्यात दोन मोठे साप आणि शेकडो पाली व बरेच उंदीर सापडले. दरवर्षी १५ आॅगस्ट रोजी येथे प्रार्थना करण्यासाठी ख्रिस्ती बांधव येतात. मी आलो त्या वेळी येथे केवळ चारशे लोक येत होते. मी अधिकाधिक लोक प्रार्र्थनेसाठी यावेत म्हणून राजभवन खुले केले. मग सहाशे व्यक्ती आल्या. नंतर दुसऱ्या वर्षी आठशे व्यक्ती आल्या. शेवटी अकराशे व्यक्ती पोहचल्या. या वर्षी ही संख्या आणखी वाढणार आहे, असे वांच्छू यांनी सांगितले. चॅपेलमधील आल्टरला सोनेरी रंग देऊन अतिशय आकर्षक व चकचकीत करण्यात आले आहे. १६८२ सालचा दोनापावल येथील टोपाज स्टोन या चॅपेलमध्ये आणून बसविण्यात आला आहे. चॅपेलची फरशी, फर्निचर सारे चकचकीत करण्यात आले आहे.
गव्हर्नर जनरलची मुलगी भारावली
१९४९ ते ५२ या काळात राजभवनवर जे गव्हर्नर जनरल राहात होते, त्यांची मुलगी गेल्या वर्षी या राजभवनवर येऊन गेली. राजभवनला अजूनही पूर्वीचेच रूप असल्याचे पाहून ती भारावली. व्हरांड्यातील टाईल्स वगैरे सगळे काही पूर्वीचेच आहे, असे ती म्हणाली. राजभवनच्या मागे अथांग सागर आहे. तिथे मी हे पाहा चांगले ‘सोपो’ बांधून घेतले आहेत, असे सांगत राज्यपालांनी ते सोपो दाखवले. पूर्वी मागे ध्वजस्तंभ नव्हता. मी तिथे हा स्तंभ उभा करून घेतला. सूर्यास्ताच्या वेळी शंभर-दीडशे लोकांना बसवून कार्यक्रम करता यावा म्हणून छोटे व्यासपीठ आणि प्रशस्त जागा करून घेतली. आम्ही इथे बासरी वादनासारखे अनेक कार्यक्रम केले. राजभवनचा हा भाग नयनमनोहारी असून समुद्राच्या साक्षीने सायंकाळचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. एका टोकाला नुसतीच जागा होती, तिथे राज्यपालांनी ग्रीनरी घालून घेऊन छोटे
गार्डन केले.

Web Title: 'Raj Bhavan got old glory'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.