गडगडाटासह पावसाची हजेरी
By Admin | Updated: May 19, 2014 01:31 IST2014-05-19T01:25:09+5:302014-05-19T01:31:27+5:30
पणजी : राज्यात अनेक भागात रविवारी सायंकाळी पावसाने गडगडाटासह हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला.

गडगडाटासह पावसाची हजेरी
पणजी : राज्यात अनेक भागात रविवारी सायंकाळी पावसाने गडगडाटासह हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला. गेले दोन दिवस लोक असह्य उकाड्याने हैराण झाले होते. रविवारी पारा ३५.३ डि. सें. वर पोचला. दमटपणामुळे उष्म्यात वाढ होऊन उकाडा असह्य बनला होता. घामाच्या धारा लागल्याने लोकांनी रविवारची सुट्टी असूनही घरीच राहाणे पसंत केले होते. राजधानी शहरात रात्री ८.३0 च्या सुमारास जोरदार सरी झडल्या. फातोर्डा, मडगावमध्येही सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. संध्याकाळपासून या परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. राज्यात ढगाळ वातावरण असून आगामी २४ तासांत काही भागात पावसाच्या किरकोळ सरींची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागापासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेत बदल झाला आहे. मॉइश्चरही वाढल्याने हवामान ढगाळ आहे. पुढील दोन दिवस असेच ढगाळ वातावरण असेल त्यानंतर ते कमी होऊन पुन: हवेत बदल होऊ शकतो. दमटपणा असल्याने उष्मा जाणवत होता. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र, सायंकाळनंतरच पाऊस झाला. किमान तापमान २६.८ डि. सें होते तर आर्द्रता सायंकाळी ५.३0 वाजता ८१ टक्के इतकी होती. मान्सून अंदमानमध्ये दाखल झाल्याचे सांगण्यात येत असून यंदा मान्सूनला पोषक वातावरण असल्याचा दावा केला जात आहे. गडगडाटामुळे विजेचा लपंडावही चालू होता. राजधानी शहरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले. तसेच रात्री पर्वरीत तीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. (प्रतिनिधी)