मनोहर पर्रीकरांना पदावरुन न हटविण्यामागे राफेल डील, कॉंग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 21:23 IST2018-09-23T21:23:24+5:302018-09-23T21:23:40+5:30
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असून उपचारांसाठी त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तरीही त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटविले जात नाही याचे मुख्य कारण म्हणजे राफेल डील असावे असा तर्क गोव्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काढला आहे.

मनोहर पर्रीकरांना पदावरुन न हटविण्यामागे राफेल डील, कॉंग्रेसचा आरोप
पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असून उपचारांसाठी त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तरीही त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटविले जात नाही याचे मुख्य कारण म्हणजे राफेल डील असावे असा तर्क गोव्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काढला आहे.
पत्रकार परिषदेत याविषयी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे देशाचे संरक्षण मंत्रीही होते. त्यामुळे राफेल डील विषयी त्यांना बरीच माहिती असणारच. त्यामुळेच आजारी असताना आणि इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असतानाही त्यांच्याकडून मुख्यमंत्री पदाची सूत्रे काढून घेण्याचे धाडस पंतप्रधान दाखवित नाहीत.
दरम्यान, गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यावर जोरदार टीका करताना त्यांनी गोवेकरांना फॉर्मेलीनयुक्त विषारी मासळी खाण्यास सरकार भाग पाडत असल्याचे सांगितले. एफडीए जे कीट घेऊन चाचणी करते, तेच कीट घेऊन एफएसएसआएतर्फे नमूद करण्यात आलेली प्रक्रिया पार पाडून चाचणी करण्यात आली. या चाचणीत मासळी फॉर्मेलीनयुक्त असल्याचे आढळून आले, असे त्यांनी सांगितले. याचाच अर्थ गोवेकरांना विषारी मासळी खायला दिली जात आहे, असा होतो असे ते म्हणाले. गोमंतकीय जनतेचा हा विश्वास घात असून आरोग्य मंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यायला हवे असे त्यांनी सांगितले.
सरकारला गोमंतकिायंच्या आरोग्याची काळजी आहे की केवळ मासळी माफियाचे हीत साधायचे आहे असा प्रश्नही त्यांनी केला. त्यांना जर खरोखरच लोकांचा कळवळा असेल तर त्यांनी अन्न व औषध प्रशसनाच्या पथकासह मडगाव मासळी बाजारात यावे आणि सर्वासमक्ष चाचणी स्वत: पहावी. तसे न करता ते बेजबाबदार विधाने करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.