दलालांना बाजूला करा; पर्यटनमंत्र्यांनी व्यावसायिकांना खडसावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 10:20 IST2025-11-01T10:19:22+5:302025-11-01T10:20:00+5:30
'गाईड' उपलब्ध करणार

दलालांना बाजूला करा; पर्यटनमंत्र्यांनी व्यावसायिकांना खडसावले
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :पर्यटन क्षेत्रात बेकायदेशीर दलालांना थारा देऊ नका. उद्योगांनी आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करावे आणि अनधिकृत व्यक्तींना सहभागी होऊ देऊ नये. राज्य सरकार तुम्हाला मदत करेल' असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शुक्रवारी पणजीतील कार्यालयात मंत्री खंवटे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत पर्यटन खात्याचे संचालक केदार नाईक उपस्थित होते. या क्षेत्रात केवळ प्रमाणित मार्गदर्शकच (सर्टिफाइड गाईड) आवश्यक आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री खंवटे म्हणाले की, 'बेकायदेशीर दलालांना आळा घालण्यासाठी आम्ही प्रमाणित मार्गदर्शक तयार करण्याचे प्रशिक्षण देत आहोत. या प्रशिक्षणासाठी तसेच मार्गदर्शक पदांसाठी जागाही उपलब्ध आहेत. युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा. प्रमाणित मार्गदर्शकांना चांगले उत्पन्न मिळेल. राज्यातील पर्यटनाची गुणवत्ता टिकवण्यासाठी पर्यटकांचा विश्वास वाढवण्यासाठी आणि बेकायदेशीर दलाल थांबवणे अत्यावश्यक आहे.
'सध्या सुरू असलेल्या बिगरमोसमी पावसामुळे पर्यटन क्षेत्राशी निघडीत असलेल्या जलक्रीडा व्यावसायिकांना बोटी चालविणे अशक्य होत आहे. त्यामुळे त्यांच्या व्यावसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे या जलक्रीडा व्यावसायिकांना मदत करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे' असे खंवटे यांनी सांगितले.
मंत्री म्हणाले, 'राज्याच्या विविध पर्यटन ठिकाणी फोटोग्राफी करण्यासाठी यापुढे १५ वर्षाचा दाखला दाखवावा लागणार आहे. खात्याने पाहणी केल्यानंतर उत्तर गोव्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय लोक बेकायदेशीर फोटोग्राफी करताना आढळले आहेत. त्यामुळे या क्षेत्रात स्थानिकांना संधी मिळावी यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.'
खंवटे म्हणाले की, 'केंद्र सरकारने अलीकडच्या काळात स्वदेश दर्शन, टाउन स्क्वेअर, युनिटी मॉल, छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल संग्रहालय यासारख्या प्रमुख पर्यटन प्रकल्पांसाठी ४७२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पर्यटन पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि राज्यासाठी मनोरंजन वारसा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.'
पर्यटकांची संख्या वाढली...
मंत्री खंवटे म्हणाले, 'राज्यात परदेशी पर्यटकांची संख्या घटलेली नसून ती वाढतच आहे. तीन महिन्यांपूर्वी, पावसाच्या हंगामातसुद्धा पर्यटकांच्या संख्येत वाढ नोंदवली गेली होती. परदेशी पर्यटकांची संख्या २०२४ पेक्षा २०२५ मध्ये २९ टक्क्यांनी वाढली आहे. यावर्षी देशी पर्यटक ५.३ टक्क्यांनी वाढले. आता पर्यटन क्षेत्रात विविध इन्फ्लुएन्सर्स भेट देणार आहेत. त्यांच्या उपस्थितीचा उद्योगावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. राज्याच्या पर्यटनात सातत्याने वाढ होत असून पर्यटन सुविधा सुधारण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.'
त्या टॅक्सी चालकांमुळे प्रतिमा मलिन
मंत्री म्हणाले की, 'राज्यातील टॅक्सी चालक हे आपल्या पर्यटन क्षेत्राचे खरे राजदूत आहेत. मात्र, काही टॅक्सी चालकांच्या गैरवर्तनामुळे राज्याची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन होत आहे. सर्व टॅक्सीचालक वाईट नाहीत. बहुतेकजण चांगले काम करतात आणि पर्यटकांना उत्कृष्ट सेवा देतात. मात्र काहीजणांच्या कृतीमुळे संपूर्ण व्यवसायावर वाईट छाप पडते. सर्व टॅक्सी चालकांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहभागी व्हावे, पारदर्शकता वाढवावी आणि पर्यटकांना विश्वासार्ह सेवा द्यावी.'
तो इव्हेंट 'आयपीएस'च्या बेजबाबदारपणामुळे
मंत्री खंवटे म्हणाले की, पर्यटन खात्याची मान्यता नसतानाही करंजाळे समुद्रकिनाऱ्यावर ओशनमॅन इव्हेंट आयोजनाचा प्रकार घडला. याला एक आयपीएस अधिकारी जबाबदार आहे. पर्यटन खात्याने संबंधित आयोजकांना दंड केला आहे. मात्र, आयपीएस अधिकाऱ्यांनी गोवा समजून घेत भावना समजून घेण्याची गरज आहे.'