पुसापती अशोक गजपती राजू गोव्याचे नवे राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 09:51 IST2025-07-15T09:50:18+5:302025-07-15T09:51:11+5:30

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरयाणा, गोवा आणि लडाखसाठी नवीन राज्यपाल नियुक्त केले आहेत.

pusapati ashok gajapathi raju is the new governor of goa | पुसापती अशोक गजपती राजू गोव्याचे नवे राज्यपाल

पुसापती अशोक गजपती राजू गोव्याचे नवे राज्यपाल

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री पुसापती अशोक गजपती राजू यांची गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरयाणा, गोवा आणि लडाखसाठी नवीन राज्यपाल नियुक्त केले आहेत.

७४ वर्षीय पी. अशोक गजपती राजू हे तेलगू देसम पार्टीचे पूर्व नेते असून २६ जून १९५१ रोजी त्यांचा जन्म झाला. ते विजयनगर रियासतच्या राजघराण्यातील आहेत आणि विजयनगरच्या शेवटच्या महाराजांचे धाकटे पुत्र आहेत. प्रशासकीय आणि कायदेविषयक अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यांनी आंध्र प्रदेश राज्य विधिमंडळाचे सदस्य म्हणून २५ वर्षाहून अधिक काळ काम केले
आहे. १३ वर्षे आंध्र प्रदेश सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. केंद्रात मोदी सरकारमध्ये त्यांनी नागरी विमान वाहतूकमंत्री म्हणून काम केले आहे. 

सध्या गोव्यात पी. एस. श्रीधरन पिल्लई हे राज्यपाल होते. ७ जुलै २०२१ रोजी त्यांची गोव्यात नियुक्ती झाली होती. येथे त्यांचा राज्यपालपदाचा कार्यकाळ चार वर्षाचा राहिला. पिल्लई यांची आता कुठेही नियुक्ती झालेली नाही. ते मूळचे केरळचे असून अलीकडे वारंवार केरळवारी करत होते. 

दरम्यान, हरयाणाच्या राज्यपालपदी प्रा. आशिम कुमार घोष, लडाखच्या नायब राज्यपालपदी कविंदर गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेथील नायब राज्यपाल ब्रिगेडियर (डॉ.) बी. डी. मिश्रा (निवृत्त) यांचा राजीनामा राष्ट्रपती मुर्मू यांनी स्वीकारला आहे. काँग्रेसकडून स्वागत प्रदेश काँग्रेसने नव्या राज्यपालांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे. पक्षाचे माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी असे म्हटले आहे की, एक अनुभवी संसद सदस्य गोव्याला राज्यपाल म्हणून मिळाला आहे. सार्वजनिक सेवा आणि संविधानिक बाबींमध्ये त्यांचा अनुभव दांडगा आहे. आम्हाला विश्वास आहे की। त्यांचा कार्यकाळ लोकशाही मूल्यांना बळकटी देईल, संविधानिक नियमांचे पालन करेल आणि गोव्याच्या लोकांच्या प्रगती आणि कल्याणात योगदान देईल.

गोव्याच्या जनतेच्यावतीने मी पुसापती अशोक गजपती राजू यांचे राज्यपाल म्हणून स्वागत करतो. ते प्रचंड प्रशासकीय आणि संसदीय अनुभव असलेले राजकारणी आहेत. विकसित गोव्याच्या दिशेने प्रवास करताना त्यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी अमूल्य ठरेल. त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

 

Web Title: pusapati ashok gajapathi raju is the new governor of goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.