गोव्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली: मायकल लोबो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 11:41 IST2025-10-02T11:40:45+5:302025-10-02T11:41:27+5:30
राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था स्थानिक खासगी बसेस तसेच कदंबा बसेसकडून पुरवली जाते.

गोव्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली: मायकल लोबो
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : गोव्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून आहे. प्रत्येक शहरात वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. वाहतुकीत तातडीने सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकारकडून पावले उचलताना सल्लागाराची नेमणूक करावी, अशी मागणी आमदार मायकल लोबो यांनी केली आहे.
राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था स्थानिक खासगी बसेस तसेच कदंबा बसेसकडून पुरवली जाते. ही व्यवस्था व्यवस्थित नसल्याने इतर वाहतूक वाढण्यास कारण ठरल्याचे लोबो म्हणाले. आज वडिलांचा व्यवसाय त्याचा मुलगा पुढे नेऊ इच्छित नाही. नवीन लोक या व्यवसायात येऊ इच्छित नाहीत. त्यांना उत्तेजन देण्यासाठी व्याजमुक्त कर्ज तसेच डिझेलवर अनुदान देण्याची गरज असल्याचे मत मांडले.
१५ लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात आज १५ लाख दुचाकी तसेच चारचाकी वाहने रस्त्यावर कार्यरत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व्यवस्थित नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना गरज भागवण्यासाठी पर्यायाचा वापर करणे भाग पडले आहे.
आज वयाची १८ वर्षे पूर्ण केलेला प्रत्येक युवक आपल्यासाठी वाहनाची खरेदी करतो. तशी मागणी तो वडिलांकडे करतो. वाहने ठेवायची कुठे, रस्त्यांचे महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले असले तरी रस्ते अपुरे ठरत आहेत. वाढत्या वाहनातून भविष्यात वाहनांसाठी रस्ते अपुरे ठरणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व्यवस्थित होणे काळाची गरज असल्याची माहिती लोबो यांनी दिली.
निर्माण झालेल्या या परिस्थितीवर अभ्यास करण्यासाठी सरकारकडून सल्लागाराची नेमणूक करण्यात यावी. गोव्यात किती प्रमाणावर बसेसची गरज आहे, यावर अभ्यास करावा, असेही आमदार मायकल लोबो यांनी सांगितले.