विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रकल्प साकारणार: मंत्री विश्वजित राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 14:23 IST2025-12-08T14:23:12+5:302025-12-08T14:23:34+5:30
तिस्क उसगावात भाजपच्या उमेदवार समीक्षा नाईक यांच्यासाठी कोपरा बैठक, आश्वासनांना बळी न पडण्याचे आवाहन

विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रकल्प साकारणार: मंत्री विश्वजित राणे
लोकमत न्यूज नेटवर्क, उसगाव : लोकांचे भले करण्यासाठी मी राजकारणात आलो आहे. गरिबांची सेवा करण्यासाठी जन्माला आलो आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे तिस्क उसगाव येथे प्रचार कोपरा बैठकीत काल रविवारी सांगितले. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या उसगाव गांजे मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवार समीक्षा नाईक यांच्या कोपरा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी भाजपच्या उसगाव गांजे मतदारसंघाच्या उमेदवार समीक्षा नाईक, उसगाव जिल्हा पंचायत सदस्य उमाकांत गावडे, सरपंच संजय उर्फ प्रकाश गावडे, उपसरपंच संगीता डोईफोडे, पंच रामनाथ डांगी, गोविंद परब फात्रेकर, नरेंद्र गावकर, राजेंद्र नाईक, विनोद मास्कारेन्स, विलियम मास्कारेन्स, रेश्मा मटकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे आदी उपस्थित होते.
उसगावात विविध प्रकल्प पुढील विधानसभा निवडणूक येण्यापूर्वी म्हणजेच मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, असे मंत्री राणे म्हणाले. त्यांनी उसगावात राबविण्यात व्येणाऱ्या विविध योजना व विकास कामांची माहिती यावेळी दिली.
डॉक्टरांनी गरिबांची सेवा करायला हवी. गरिबांची सेवा करण्यात हयगय करणाऱ्या डॉक्टरांवर मी ओरडणारच. माझी बदनामी कुणी कितीही करू. त्याची पर्वा नाही.
गरिबांचे जीवन वाचविण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, असे मंत्री विश्वजित राणे पुढे म्हणाले. निवडणूक काळात दिशाभूल करणारे अनेक जण येतील, त्यांना बळी पडू नका. त्यांनी आम्ही लोकांसाठी काय करू शकतो, याचा विचार करायला हवा, असे मंत्री राणे म्हणाले.
टीकेचा फरक पडत नाही
कुणी माझ्यावर टीका केली तर काहीच फरक पडत नाही. विरोधी पक्षाचे नाव घेत नाही. कारण त्यांचे अस्तित्व मिटण्याची वेळ आली आहे. सरकार चालविण्यासाठी योग्य माणसे सरकारात हवी असतात. २०२७ च्या विधानसभेत भाजपचे २७पेक्षा जास्त जण निवडून येतील, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला. यावेळी सरपंच संजय ऊर्फ प्रकाश गावडे, उसगावचे भाजप उमेदवार समीक्षा नाईक यांनी आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार रामनाथ डांगी यांनी मानले.