सनबर्न संगीतात देवाचा फोटो वापरल्याने आपकडून निषेध; आपचे समन्वयक ॲड. अमित पालेकर करणार पोलीस तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 14:09 IST2023-12-29T14:09:03+5:302023-12-29T14:09:22+5:30
याविरोधात त्यांनी पाेलीस स्थानकात तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सनबर्न संगीतात देवाचा फोटो वापरल्याने आपकडून निषेध; आपचे समन्वयक ॲड. अमित पालेकर करणार पोलीस तक्रार
नारायण गावस
पणजी : सनबर्न सारख्या दारु ड्रग्जच्या धुंदीत नाचणाऱ्या संगीताच्या कार्यक्रमात महादेवाचा फोटो स्क्रीनवर लावून नृत्य केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे समन्वयक ॲड. अमित पालेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याविरोधात त्यांनी पाेलीस स्थानकात तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ॲड. अमित पालेकर म्हणाले सनबर्न सारख्या कार्यक्रमात कुठल्याच धर्माच्या देवतांना आणू नये. तरीही कार्यक्रमात हिंदू धर्मातील देवाचा फोटो मागच्या स्क्रीनवर दाखवून त्याच्यावर नृत्य केले आहे. हा सर्व हिंदू लोकांच्या भावनांशी खेळ आहे. सनबर्न कार्यक्रमाला अगोदरच लाेकांचा विरोधात आहे. तरीही सरकारसोबत साटेलोटे करुन हा संगीत महोत्सव राज्यात आयोजित केला जातो. यात दारु ड्रग्जचे सेवन हाेत असते. असे असतानाही कुठेच लाेकांची भावना न राखता अशा प्रकारे देवाचे फोटो लावून नृत्य करणे कितपत याेग्य आहे, असे ॲड. अमित पालेकर म्हणाले.
ॲड. अमित पालेकर म्हणाले, भाजप सनातन धर्माविषयी बाेलत आहे. त्यांना हा सनातन धर्माचा अपमान दिसत नाही काय? फक़्त निवडणूकावेळी भाजपला सनातन धर्म दिसतो. आपल्या स्वार्थासाठी भाजपला सनातन धर्माचा वापर करायला हवा आहे. पण आम्ही आम आदमी पक्ष असे प्रकार खपवून घेणार नाही. या प्रकरणी आयोजकांविरुद्ध लवकरच तक्रार दाखल केली जाणार आहे.