आदिवासी भवन उभारण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करावी; आमदार गोविंद गावडे यांची अधिवेशनात मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 09:00 IST2025-08-07T08:59:33+5:302025-08-07T09:00:38+5:30
आमदार गोविंद गावडे म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवतानाच शाळांतील पायाभूत सुविधांचा विकास करावा.

आदिवासी भवन उभारण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करावी; आमदार गोविंद गावडे यांची अधिवेशनात मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आदिवासी भवन उभारले जाईल, असे आश्वासन मिळाले असले तरी क्षुल्लक कारणांसाठी हे भवन उभारण्यास विलंब होत आहे. आदिवासी भवन उभारण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी मागणी प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी अनुदानीत मागण्यांवर चर्चेवेळी केली.
गावडे म्हणाले, आदिवासी भवनचा विषय हा बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. या भवनसाठी जी जागा ठरली होती त्याचा विषय न्यायप्रविष्ट असल्याचे सरकार सांगत आहे. प्रत्यक्षात या जागेला सेरुला कोमुनिदादने चो आक्षेप घेतला होता, तो मागे घेतल्याचे त्यांनी न्यायालयात नमूद केले आहे. त्यामुळे हे भवन उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याने त्याला गती द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
गावडे म्हणाले की, आदिवासी कल्याण खात्याकडून विविध सरकारी योजना राबवल्या जातात. मात्र, त्याबाबत अनेकांना माहिती नसून त्याची जागृती व्हावी. खात्याच्या एका योजनेंतर्गत अंत्यसंस्कारासाठी २० हजार रुपयांपर्यंतचा अर्थसहाय्य मंजूर केला जातो. यात वाढ करुन ही रक्कम ४० हजार रुपये करावी. वजन व माप खात्याच्या संचालकांना निवृत झाल्यानंतर पुन्हा एकदा सेवावाढ दिली आहे. त्यांना सेवावाढ कशाला? यामुळे या पदासाठी पात्र असलेल्या एसटी समाजाच्या महिला अधिकाऱ्यावर अन्याय होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षकांच्या रिक्त जागा भरा
आमदार गोविंद गावडे म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवतानाच शाळांतील पायाभूत सुविधांचा विकास करावा. वर्ग, आसनव्यवस्था यांचे नुतनीकरण करावे ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमी आहे, ती भरुन काढावी. सरकारी प्राथमिक शाळांवर विशेष लक्ष द्यावे.