रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य; मंत्री दिगंबर कामत यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 08:28 IST2025-09-04T08:27:26+5:302025-09-04T08:28:31+5:30
साबांखाची स्वीकारली सूत्रे

रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य; मंत्री दिगंबर कामत यांची ग्वाही
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर तब्बल १३ वर्षांनंतर, बुधवारी दिगंबर कामत यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. कामत यांची नुकतीच मंत्री म्हणून निवड झाली होती. अभियंत्यांकडून माहिती घेऊन राज्यातील आवश्यक रस्ते दुरुस्ती आणि खड्डे भरण्याच्या कामांना प्राधान्य दिले जाईल, असे कामत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मंत्री कामत म्हणाले की, विभागाच्या अभियंत्यांची बैठक घेतली जाईल आणि एकंदर स्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर अल्पकालीन आणि दीर्घकालीन कामाचे आराखडे तयार केले जातील. बुधवारी कामत यांनी आपला कक्षप्रवेश केला. मंत्रालयात आपल्या केबिनमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी तेथील देवांच्या फोटोंचे पूजन केले. त्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप केला. कक्षातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
दिगंबर कामत यांनी २०१२ पर्यंत मुख्यमंत्रीपद भूषविले होते. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर वारंवार कामत यांच्या भाजप प्रवेशाबाबत अफवा उठत होत्या. भाजप पुन्हा सत्तेवर आल्यावर कामत यांनी पक्षप्रवेश केला.
अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन आराखडा तयार करणार
सूत्रे स्वीकारल्यानंतर पत्रकारांनी राज्यातील खराब रस्त्यांविषयी विचारणा केली असता मंत्री कामत म्हणाले की, अधिकाऱ्यांकडून राज्यातील रस्त्यांची स्थिती जाणून घेतली जाईल. त्यावर काय उपाययोजना करायच्या याविषयी त्यानंतर निर्णय घेतला जाईल. त्यानंतर खराब रस्ते व इतर बाबतीत धोरण ठरवले जाईल. मी पूर्वी वीजमंत्री असताना अशाच पद्धतीने कामकाजाचा आढावा घेऊन धोरण ठरवले होते. माझ्याकडे असलेल्या विविध खात्यांच्या कामकाजामध्ये सुसुत्रता आणण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या केल्या जातील.