खुर्चीलाच प्राधान्य
By Admin | Updated: January 4, 2015 02:29 IST2015-01-04T02:22:42+5:302015-01-04T02:29:54+5:30
अडीच वर्षांत एलिनांची एकही मागणी मान्य नाही

खुर्चीलाच प्राधान्य
पणजी : एलिना साल्ढाणा एकमेव महिला मंत्री असल्या, तरी त्यांच्याकडून अडीच वर्षांत केलेल्या एकूण महत्त्वाच्या मागण्यांपैकी एकही मागणी सरकारने मान्य केलेली नाही. तरीही त्यांनी एकदाही आक्रमक भूमिका घेतली नाही.
साल्ढाणा या ठाम भूमिका घेत नसल्याची कल्पना गोवाज मूव्हमेंट फॉर स्पेशल स्टेटस या संघटनेच्या काही सदस्यांनाही आली आहे. आपण प्रसंगी राजीनामा देऊ, अशी भाषा सभांमध्ये साल्ढाणा यांनी यापूर्वी करून टाळ््याही मिळविल्या आहेत. गोव्याला खास दर्जा मिळवून देण्याच्या साल्ढाणा यांच्या मागणीबाबत गोवा सरकार गंभीर नाही.
खास दर्जा मिळणे शक्य नाही, असे गोवा सरकारला वाटते व त्याच सरकारमध्ये साल्ढाणा वनमंत्री आहेत.
साल्ढाणा यांनी दाबोळी येथून नौदलाचा तळ अन्यत्र हटवावा, अशी मागणी यापूर्वी केली; पण अशा प्रकारची मागणी ही मान्य करता येणार नाही, ती अराष्ट्रीय आहे, असे उत्तर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी यापूर्वी जाहीरपणे दिले. गोव्याला दोन विमानतळ नको, असे मंत्री साल्ढाणा जाहीरपणे म्हणतात; पण त्यांचे सरकार मोपा विमानतळाबाबत ठाम आहे. गोव्यातील अभयारण्यांना प्रत्येकी तीन किलोमीटरचा बफर झोन असावा, अशा प्रकारची मागणीही साल्ढाणा यांनी केली होती; पण राज्य सरकारने एक किलोमीटरचा बफर झोन असावा असा निर्णय घेतला. त्याविरुद्ध साल्ढाणा यांनी नंतर काही केले नाही. एकंदरीत साल्ढाणा या आपण स्वर्गीय माथानी यांचा वारसा पुढे नेत असल्याचे सांगत प्रत्यक्षात सरकारमध्येच सुरक्षित राहण्याचा मार्ग पत्करतात. (खास प्रतिनिधी)