कर्जासाठी वेदश्रीवर वाढत होता दबाव
By Admin | Updated: July 22, 2014 07:30 IST2014-07-22T07:27:59+5:302014-07-22T07:30:56+5:30
मडगाव : पती व सासू-सासऱ्याच्या जाचाला कंटाळून आपल्या मुलीसह आत्महत्या करणाऱ्या वेदश्री परबची मागची चार वर्षे सतावणूक चालू होती, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

कर्जासाठी वेदश्रीवर वाढत होता दबाव
मडगाव : पती व सासू-सासऱ्याच्या जाचाला कंटाळून आपल्या मुलीसह आत्महत्या करणाऱ्या वेदश्री परबची मागची चार वर्षे सतावणूक चालू होती, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. एका बाजूने घर बांधण्यासाठी तिने ५ लाखांचे कर्ज काढावे यासाठी, तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिने आपली नोकरी सोडावी यासाठीही तिच्यावर दबाव येत होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
या प्रकरणात वेदश्रीचे पती योगेश परब, पोलीस उपनिरीक्षक असलेले सासरे आत्माराम परब व सासू अमिता परब यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून, दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश वंदना तेंडुलकर यांच्यासमोर या अर्जावर मंगळवारी युक्तिवाद होणार आहे. या तिन्ही संशयितांना जामीन देण्यात येऊ नये, अशी मागणी मडगाव पोलिसांनी लेखी निवेदनाद्वारे न्यायालयाकडे केली आहे.
मागच्या मंगळवारी वेदश्रीने आपली चार वर्षांची मुलगी यशवी हिच्यासह जुआरी नदीत उडी टाकून आत्महत्या केली होती. या प्रकरणात तिचा पती व सासू-सासऱ्याविरुद्ध मडगाव पोलिसांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलम ३०६, तर छळ केल्याच्या कलम ४९८(अ) खाली गुन्हे नोंद केले आहेत. आतापर्यंत या प्रकरणात १७ जणांच्या जबान्या नोंद केल्याची माहिती मडगावचे पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांनी दिली.
वेदश्रीचे वडील यशवंत गावस यांच्या तक्रारीप्रमाणे, तिला मुलगी झाल्यानंतर तिचा सासूरवास सुरू झाला होता. पणजीहूून कामावरून परतल्यावर घरात तिच्याकडून घरकाम करून घेतले जायचे. या जाचामुळेच ती कंटाळली होती.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, परब यांनी घर बांधायचे काम हाती घेतले असून, या घरासाठी वेदश्रीने यापूर्वी तीन लाखांचे कर्ज काढले होते. तिने आणखी पाच लाखांचे कर्ज काढावे यासाठी तिच्यावर दबाव येत होता. पोलिसांकडून न्यायालयात जे निवेदन सादर करण्यात आले आहे, त्यात या घटनेनंतर तिन्ही संशयितांना अटक करण्यासाठी पोलीस पथक त्यांच्या घरी गेले असता त्यांचे घर बंद असल्याचे आढळले. या घटनेनंतर तिन्ही संशयित भूमिगत झाल्याचे या निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)