राज्य चित्रपट महोत्सवाची तयारी सुरू; मुख्यमंत्र्यांकडून आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 11:01 IST2025-07-17T11:00:31+5:302025-07-17T11:01:54+5:30
१४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत आयोजन

राज्य चित्रपट महोत्सवाची तयारी सुरू; मुख्यमंत्र्यांकडून आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री डॉ, प्रमोद सावंत यांनी मनोरंजन संस्थेच्या अठराव्या आमसभा बैठकीत येत्या दि. १४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राज्य चित्रपट महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला.
मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष आमदार डिलायला लोबो, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू व अन्य वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते. चित्रपट महोत्सवाची तयारी तसेच लॉजिस्टिक नियोजन, प्रोग्रामिंग आणि प्रमोशनल यावर चर्चा करण्यात आली. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात गोवा राज्य चित्रपट महोत्सवाच्या दहाव्या, अकराव्या आणि बाराव्या आवृत्त्यांचा समावेश आहे आणि तो माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या सहकार्याने आयोजित केला जाईल.
गोव्यातील चित्रपटांच्या ७५ वर्षांच्या थीमवर आधारित हा चित्रपट महोत्सव असेल. फिचर फिल्मही असतील. दहाव्या आवृत्तीत १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत बनवलेले चित्रपट दाखवले जातील. अकराव्या आवृत्तीत १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत बनवलेले तर बाराव्या आवृत्तीत १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत बनवलेले चित्रपट दाखवले जातील.
मराठी-कोंकणी चित्रपटांची मांदियाळी
मॅकनिझ पॅलेस थिएटर आणि आयनॉक्समध्ये या महोत्सवाचे चित्रपट दाखवले जातील. विविध कार्यशाळा, संभाषण सत्रे असतील. स्पर्धा विभागासाठी चित्रपट सादर करण्याची प्रक्रिया १७ जूनपासून ७ जुलैपर्यंत चालली. या महोत्सवात गोव्यातील प्रादेशिक भाषेतील कोंकणी आणि मराठी भाषांमधील चित्रपट दाखवले जातील.