मुख्यमंत्री सावंत यांचा सिक्सर; आज ६ वर्षे पूर्ण, केंद्र व राज्यस्तरावरून अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 08:00 IST2025-03-19T07:59:29+5:302025-03-19T08:00:19+5:30
१९ मार्च २०१९ पासून कार्यभार

मुख्यमंत्री सावंत यांचा सिक्सर; आज ६ वर्षे पूर्ण, केंद्र व राज्यस्तरावरून अभिनंदन
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आपल्या कारकिर्दीची सहा वर्षे आज पूर्ण करत आहेत. दि. १९ मार्च २०१९ पासून आतापर्यंत सलग सहा वर्षे पूर्ण करत कारकिर्दीचा सिक्सर मारणारे प्रमोद सावंत हे भाजपमधील पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. दोन टर्ममध्ये मिळून त्यांनी सहा वर्षे पूर्ण केली. यात मध्येच खंड पडला नाही. मुख्यमंत्री सावंत यांचे या यशाबाबत राज्यभरातून आणि केंद्रीय स्तरावरूनही अभिनंदन होत आहे.
मुख्यमंत्र्यांनी काल दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेतली. गृहमंत्री अमित शहा यांनाही भेटून त्यांनी पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद प्राप्त केले. मुख्यमंत्री सावंत यांनी गृहमंत्री शहा यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. या भेटीत नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी, राज्यातील खाण उद्योगासह विविध विषयांवर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, राज्यात मंत्रिमंडळ फेररचनेची चर्चा सुरू असताना या भेटीने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी सभापती रमेश तवडकर यांनी १५ दिवसांत मंत्रिमंडळात बदल होणार असल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड पाठविण्यात आले असून, फेररचनेचा निर्णय भाजपचे प्रभारी बी. एल. संतोष जाहीर करतील, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे आता पुन्हा राजकीय घडामोडींबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
मंत्रिमंडळातील विद्यमान मंत्र्यांपैकी कुणाला ठेवायचे व कुणाला वगळायचे? तसेच कुणाला नवीन मंत्री म्हणून सामावून घ्यायचे याचा निर्णयही हायकमांडच घेणार असल्यामुळे दिल्ली दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री याबाबत नेत्यांशी मुख्यमंत्री चर्चा करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत अनेक दिवसांपासून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदार मंत्रिपद मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, अजून फेरबदलाबाबत कोणत्याही ठोस हालचाली दिसत नसल्याने त्यांच्याही नजरा दिल्लीकडे लागून आहेत.
दामूंची दिल्ली भेट
मुख्यमंत्री दिल्ली भेटीवर असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईकही मंगळवारी दिल्लीला पोहोचले आहेत. त्यांचीही दिल्ली भेट खासगी स्वरूपाची असल्याचे सांगितले जाते. परंतु मुख्यमंत्री दिल्लीला असतानाच दामूंच्या खासगी भेटीचा केवळ योगायोग की आणखी काय ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दामू हे दिल्लीत केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात काल रात्री सहभागी झाले.
रेल्वेमंत्र्यांची भेट
मुख्यमंत्र्यांनी शाह यांची भेट घेतल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांचीही भेट घेतली. या भेटीत त्यांनी पेडणे ते काणकोण जलद ट्रेनसाठी प्रस्तावही सादर केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.