सर्वांचे लक्ष रितेश-केतनकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 07:05 IST2026-04-08T07:02:09+5:302026-04-08T07:05:37+5:30
भाजपने फोंड्यातील पोटनिवडणुकीत आपली सगळी शक्ती वापरली आहे.

सर्वांचे लक्ष रितेश-केतनकडे
भाजपने फोंड्यातील पोटनिवडणुकीत आपली सगळी शक्ती वापरली आहे. जाहीर प्रचार काल मंगळवारी सायंकाळी थांबला. रवी नाईक यांचे निधन झाल्यामुळे फोंड्यात विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. रवी नाईकांकडे करिष्मा होता. भंडारी समाजात त्यांची लोकप्रियताही विशेष होती. सामान्य व्यक्तीशी सहज कनेक्ट होण्याची शैली होती. म. गो.तून काँग्रेसमध्ये व काँग्रेसमधून दोनवेळा भाजप असा त्यांचा प्रवास झाला. मुख्यमंत्री, खासदार, विरोधी पक्षनेते, मंत्री अशी विविध पदे रींनी भूषवली होती. त्यांचे पुत्र रितेश नाईक यांना भाजपने तिकीट दिले.
रितेशला प्रचार करताना सुरुवातीला अडचणी आल्या. काँग्रेस पक्ष रितेशचा घाम काढतोय असे जाणवताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपले दौरे वाढवले. फोंड्यात वारंवार जाऊन त्यांनी अनेक बैठका घेतल्या. राजस्थानी, गुजराती, उत्तर प्रदेशमधील अनेक हिंदू, जे फोंड्यात स्थायिक झालेले आहेत, त्या सर्वांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या गेल्या. वाहतूकदारांचीही बैठक घेऊन विविध आश्वासने देण्यात आली. फोंड्याच्या विकासासाठी शंभर कोटींचा निधीही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी तर फोंड्यात तळच ठोकला होता. त्याशिवाय सध्याच्या सरकारमधील विविध मंत्री, आमदार यांचा ताफाही प्रचारासाठी वापरला गेला. सर्वांच्या कष्टामुळे भाजपने वेगळे वातावरण तयार केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही एक सभा सोमवारी फोंड्यात घेतली गेली.
काँग्रेस पक्षाने केतन भाटीकर यांना तिकीट देण्याची चाल खेळली. ही चाल प्रभावीच आहे. मगो पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर केतन काँग्रेसमध्ये जातील हे अपेक्षित होते. त्यानुसार ते काँग्रेसमध्ये गेले व तिकीट प्राप्त केले. काँग्रेसच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी केतनचा जोरदार प्रचार केला. तसे पाहता फोंडा हा पूर्वी काँग्रेसचाच बालेकिल्ला होता. रवी नाईक यांच्या नेतृत्वामुळे ते शक्य झाले होते. रवींनी काँग्रेस पक्ष जर सोडला नसता, तर फोंडा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहिला असता.
२०२२ साली प्रथमच भाजपने हा मतदारसंघ जिंकला. रवी भाजपवासी झाल्यानंतर राजेश वेरेकर यांनी काँग्रेसचे काम फोंड्यात वाढवले. त्यांनी स्वतः एका निवडणुकीत सहा-सात हजार मते प्राप्त करून दाखवलीही. राजेशची स्वतःची मते फोंड्यात आहेत, त्यापैकी किती मते ते यावेळी केतनसाठी वळविण्यात यशस्वी झाले, हे निकालावेळी कळणार आहे. उद्या ९ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. फोंड्यात कुणालाही जर विचारले तर लढत अटीतटीची आहे, असेच उत्तर मिळते. काँग्रेस व भाजपचे समर्थकही स्पष्टपणे सांगतात की टक्कर जोरदार झालेली आहे. प्रचारावेळी भाजप, काँग्रेस व आप अशा सर्वांनीच खूप कष्ट घेतले.
आम आदमी पक्षाने अरविंद केजरीवाल व इतरांच्या सभा फोंड्यात आयोजित केल्या होत्या. मात्र, आपची शक्ती ही फोंडा मतदारसंघात मर्यादित आहे. अर्थात फोंड्यात जय-पराजय कुणाचा होईल हे आजही सांगता येत नाही. आरजीचा उमेदवार यावेळी रिंगणात नाही. केतन भाटीकर यांनी स्वतः जिवाचे रान करून प्रचार केला आहे. केतनचे सामाजिक काम फोंड्यात आहे, गुडवील आहे, पण भाजपसारखा मोठा पक्ष त्यांच्या विरोधात आहे, हे लक्षात घ्यावे लागेल.
पूर्ण सरकार, सरकारचे मगोसारखे घटक पक्ष वगैरे सगळे भाटीकरविरुद्ध वावरले आहेत. तरीदेखील भाटीकर यांनी प्रचारावेळी आपल्या विरोधकांचा घाम काढलाय, हेदेखील मान्य करावे लागेल. २०२२ साली रवी नाईकांसारखा बुजुर्ग, अनुभवी नेता कसाबसा ७७ मतांच्याच फरकाने जिंकला होता.
रितेश नाईक यांचा स्वभाव शांत आहे. मात्र त्यांच्यासाठी भाजपमधील पूर्वीचे सगळे असंतुष्ट जवळ आले आणि त्यांनी प्रचारकाम केले. अगदी मगोपचे नेते मंत्री सुदिन ढवळीकर किंवा भाजपचे आमदार गोविंद गावडे यांनीदेखील रितेशसाठी कष्ट घेतले आहेत. मगोपची एक नगरसेविका उघडपणे केतनसाठी वावरली. मगोपचे कार्यकर्ते भाजपसाठी काम करताना दिसून आले.
अपूर्व दळवी, सुनील देसाई यांच्यासह अनेकांनी रितेश नाईक यांचे प्रचारकाम केले. मात्र या शिवाय काहीजण आतून वेगळ्या कोणत्या चाली खेळले असतील, तर ते यापुढे कळेलच. फोंड्यातील मुस्लीम व ख्रिस्ती मतदारांची मते केतन किती प्रमाणात प्राप्त करतील, या प्रश्नाचे उत्तरही लवकरच मिळेल.