फोंडा पोटनिवडणूक: बिनविरोध निवडीची शक्यता धुसरच, इच्छुक लागले कामाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 07:56 IST2025-10-28T07:56:57+5:302025-10-28T07:56:57+5:30
आप, काँग्रेससह भाटीकरही रिंगणात उतरणार

फोंडा पोटनिवडणूक: बिनविरोध निवडीची शक्यता धुसरच, इच्छुक लागले कामाला
अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : फोंडा मतदारसंघाचे आमदार रवी नाईक यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणूक होणार की, रवी यांचे पुत्र रॉय किंवा रितेश यांना बिनविरोध निवडून आणले जाणार, याकडे अख्ख्या गोमंतकांचे लक्ष लागून राहिले आहे. रवी नाईक यांच्या निधनानंतर रितेश हे बिनविरोध निवडून येतील, अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र, जसे दिवस जाऊ लागले आहेत तसे वेगळे चित्र निर्माण होऊ लागले आहे. आम आदमी पक्षाने ही निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. दुसऱ्या बाजूने काँग्रेसचे राजेश वेरेकर यांनीही पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या निवडणुकीत केवळ ७० मतांनी पराभूत झालेले केतन भाटीकर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निवडणूक होणार हे निश्चित झाले असून औटघटकेचा आमदार होणार हे माहीत असतानाही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे.
उमेदवारीसाठी भाजपमधूनही रस्सीखेच होणार, हे निश्चित. कारण ज्या दिवशी रवी नाईक यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला, तेव्हापासूनच मूळ भाजप कार्यकर्त्यांमध्ये व नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली होती. नगरसेवक व माजी मंडळ अध्यक्ष विश्वनाथ दळवी यांनी रवी नाईक पक्षात येण्यापूर्वीपासूनच कामाला सुरुवात केली होती. त्यांनी संघटन कौशल्याच्या जोरावर कार्यकर्त्याची फळी निर्माण केली आहे; परंतु रिक्त झालेल्या जागेवर रितेश नाईक किंवा रॉय यांना भाजपने उमेदवारी दिल्यास दळवी कोणती भूमिका घेतील, हे पाहावे लागेल. ते पक्षाविरुद्ध बंड करण्याची शक्यता कमीच आहे. आता त्यांनी माघार घेतली तर २०२७ मध्ये कदाचित त्यांच्या नावाचा विचार भाजप करू शकेल.
काँग्रेसची भूमिका महत्त्वाची
या निवडणुकीत काँग्रेसलाही वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांचे नेते राजेश वेरेकर येथे काम करत असले तरी, सलग दोन वेळा त्यांचा पराभव झालेला आहे. अशावेळी काँग्रेसही केतन भाटीकर यांना आपल्याकडे ओढण्याची शक्यता आहे. फोंडा मतदारसंघाच्या बाबतीत ही लढाई काँग्रेसचे अस्तित्व सिद्ध करणारी होणार आहे. त्यामुळेच हुकमी एक्का म्हणून काँग्रेस ऐनवेळी भाटीकर यांना आपल्याकडे ओढू शकते
ढवळीकर बंधूंच्या भूमिकेकडे लक्ष
मागच्या निवडणुकीत हातातोंडाशी आलेला विजय दूर जाताना पाहिलेले केतन भाटीकर यांच्यासमोर खरे तर पेचप्रसंग उभा राहिला आहे. एका बाजूने दीपक ढवळीकर व सुदिन ढवळीकर यांनी युतीचा धर्म पाळणार असल्याचे सूतोवाच केले आहे. त्याचवेळी रितेश नाईक यांना उमेदवारी मिळाल्यास मगो त्यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे; परंतु ही घोषणा करण्यापूर्वी त्यांनी निदान केतन यांना विश्वासात घ्यायला हवे होते. तसे झाले असते तर सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली असती. आता भाटीकर यांनी निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केल्याने ढवळीकर बंधू कोणता निर्णय येणार, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
रितेश नाईक की रॉय नाईक ?
भाजपची उमेदवारी रितेश नाईक किंवा रॉय नाईक यांना मिळाल्यास त्यांच्या मागे भंडारी समाजाची संपूर्ण ताकद उभी राहील, असे चित्र सध्या तरी आहे. रविवारी बेतोडा येथे जी शोकसभा झाली, त्यावेळी जी गर्दी झाली होती, त्यावरून उमेदवारी मिळाल्यास या दोन्ही बंधूंना निवडणुकीचा पेपर सोपा जाईल, असे दिसून येते; परंतु यासाठी दोघांनी मिळून आताच एका नावावर शिक्कामोर्तब करायला हवे. एका उमेदवारीसाठी या बंधूंमध्ये चढाओढ लागल्यास भाजप वेगळा विचार करू शकेल.
केतन भाटीकर यांच्याकडून गाठीभेटी सुरू
सध्या केतन भाटीकर यांनी व त्यांच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी मतदारसंघात गाठीभेटींवर भर दिला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, ८० टक्के लोक केतन भाटीकर यांनी निवडणूक लढावी, या मताचे आहेत. त्यामुळे लोकांचे ऐकावे की आपल्या नेत्यांचे, असा प्रश्न साहजिकच भाटीकर यांच्यासमोर आहे. त्यामुळे भाटीकर अपक्ष राहतात की मगोप त्यांना उमेदवारी देईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.