अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 18:35 IST2025-11-28T18:31:05+5:302025-11-28T18:35:54+5:30
PM Narendra Modi Goa Visit: श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाच्या ५५० व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७७ फूट उंचीच्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले.

अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
PM Narendra Modi Goa Visit: भारत एका अद्भूत सांस्कृतिक पुनर्जागरणाचा साक्षीदार होत आहे. अयोध्येतील राम मंदिराचा जीर्णोद्धार, काशी विश्वनाथ धामचे भव्य पुनरुज्जीवन आणि उज्जैनमधील महाकाल विस्तार हे सर्व आपल्या राष्ट्राच्या जागृतीचे प्रतिबिंब आहे, जे आपला आध्यात्मिक वारसा नव्या जोमाने पुढे नेत आहे. ही जागृती भावी पिढ्यांना त्यांच्या मुळांशी जोडलेले राहण्यासाठी प्रेरित करते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात केले.
गोव्यातील काणकोण तालुक्यातील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या ५५० वर्षांच्या पूर्ती निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७७ फूट उंचीच्या मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यपाल अशोक गजपती राजू, बांधकाम मंत्री दिगंबर कामत, उद्योगपती शिवानंद साळगावकर, अनिल पै यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत.
गोव्यातील संस्कृतीचे मूळ सार टिकवून ठेवले
गोव्यातील मंदिरे आणि स्थानिक परंपरा धोक्यात आल्या होत्या आणि भाषा, सांस्कृतिक ओळख प्रभावित झाली होती. परंतु या परिस्थितीतही जनभावना कमकुवत झाल्या नाही; उलट ती अधिक बळकट झाली. गोव्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या संस्कृतीने सर्व बदलांमधून मूळ सार टिकवून ठेवले आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले. तसेच विकसित भारताचा मार्ग एकतेतून जातो. जेव्हा समाज एकत्र येतो, जेव्हा प्रत्येक क्षेत्र आणि वर्ग एकत्र उभा राहतो, तेव्हाच राष्ट्र पुढे मोठी झेप घेऊ शकते. श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाचे प्राथमिक ध्येय म्हणजे लोकांना एकत्र करणे, मनांना जोडणे आणि परंपरा आणि आधुनिकतेमध्ये बंध निर्माण करणे असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी गोव्यात सांगितले ९ संकल्प
या ठिकाणी मला नऊ गोष्टी सांगायच्या आहेत. या नऊ संकल्पांसारख्या आहेत. विकसित भारताचे स्वप्न तेव्हाच साकार होईल जेव्हा आपण पर्यावरणाचे रक्षण करू. एक म्हणजे पाणी वाचवणे. दोन म्हणजे झाडे लावणे. तिसरे म्हणजे स्वच्छता अभियान. चौथी गोष्ट स्वदेशी स्वीकारणे. पाचवे देश दर्शन करणे. आपण देशाच्या विविध भागांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सहावे म्हणजे नैसर्गिक शेतीला आपल्या जीवनाचा एक भाग बनवणे. सातवे म्हणजे निरोगी जीवनशैली स्वीकारणे. आपल्या अन्नातील तेलाचे प्रमाण १० टक्के कमी करणे. आठवे म्हणजे योग आणि खेळ स्वीकारणे. नववे म्हणजे गरिबांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करणे, असे संकल्प घेऊन पुढे जाण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
मठाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरले
गोव्यावर वर्षानुवर्षे विविध राजवटींनी राज्य केले, ज्यापैकी काहींनी गोव्याच्या मूळ संस्कृतीला नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र अशा कठीण काळातही मठाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरले, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नमूद केले. गोव्याचा सांस्कृतिक वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असताना, या मठासारख्या संस्थांनी दिलेल्या योगदानामुळेच आज गोव्याची हिंदू परंपरा आणि संस्कृती इतक्या वर्षांनंतरही टिकून राहिली आहे, असेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.
दरम्यान, श्रीराम मूर्तीचे हे अनावरण केवळ एका धार्मिक सोहळ्यापुरते मर्यादित नसून, गोव्याच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होणारा क्षण ठरल्याचे म्हटले जात आहे. गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीचं डिझाईन करणारे शिल्पकार राम सुतार यांनीच गोव्यातील श्रीरामांच्या मूर्ती घडवली आहे. ही आशियातील सर्वात उंच प्रभू श्रीरामांची मूर्ती असल्याचे सांगितले जात आहे.
#WATCH | Goa | Prime Minister Narendra Modi unveiled a 77-foot statue of Lord Ram made up of bronze at Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math.
— ANI (@ANI) November 28, 2025
The Prime Minister is visiting the math on the occasion of ‘Sardha Panchashatamanotsava’, the 550th-year celebration of the… pic.twitter.com/LgSQEvASbc