पंतप्रधान मोदी पर्तगाळ मठात करणार श्रीरामांच्या ७७ फूट उंच पुतळ्याचे अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 12:58 IST2025-11-28T12:57:21+5:302025-11-28T12:58:47+5:30
श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जिवोत्तम मठाच्या ५५० व्या वर्षपूर्तीनिमित श्रीरामांच्या ७७ फूट उंच पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे.

पंतप्रधान मोदी पर्तगाळ मठात करणार श्रीरामांच्या ७७ फूट उंच पुतळ्याचे अनावरण
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी गोव्यात येणार आहेत. यावेळी श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जिवोत्तम मठाच्या ५५० व्या वर्षपूर्तीनिमित श्रीरामांच्या ७७ फूट उंच पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पर्तगाळ मठ परिसर व आजूबाजूच्या भागात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय हेलिपॅडही उभारले आहेत. गोवा पोलिसांनी तेथे सुरक्षेचा आढावा घेत वाहतुकीत आवश्यक बदल केले आहेत. दुपारी साधारण ३:१५ वाजता पंतप्रधान मोदी गोव्यात दाखल होण्याची अपेक्षा आहे.
पर्तगाळ येथील जिवोत्तम मठाच्या ५५०व्या वर्षपूर्तीनिमित ११ दिवस उत्सव चालणार आहे. या उत्सवात सांस्कृतिक, आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांचा समावेश केला असून, विविध पीठांचे मठाधीश सहभागी होणार आहेत.
या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे श्रीरामांची ७७ फुटांची भव्य-दिव्य अशी मूर्ती असून, ती पूर्णपणे ब्राँझपासून बनवली आहे. शिवाय १० हजार चौरस मीटर क्षेत्रफळात 'रामायण थीम पार्क' उभारले असून, यात भगवान श्रीरामांचे दर्शन घडवणारे तिकीट प्रदर्शन, प्राचीन नाणी आदी गोष्टींचे प्रदर्शन लोकांना पाहण्यास मिळणार आहे.
गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना : मुख्यमंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी पर्तगाळ येथे जीवोत्तम मठाच्या ५५० व्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत करताना गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला आता चालना मिळेल, असे म्हटले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, 'मिरामार येथे सरकारने भगवान परशुरामाचा भव्य पुतळा उभारला. आता पर्तगाळ येथे जीवतम मठाने प्रभू श्री रामचंद्रांचा ७७ फुटी पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे आज मोदींच्या हस्ते अनावरण होत आहे, ही गोव्यासाठी अभिमानाची बाब आहे. पर्तगाळ मठ आणि प्रभू श्री रामचंद्राचा पुतळा गोव्यासाठी भूषण असून आता पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी भेट देतील, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.