भ्रष्टाचार अन् अहंकारात बुडलेल्या सत्तेला जनतेने नाकारले: मुख्यमंत्री; दिल्लीतील विजयाचा गोव्यात आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2025 11:40 IST2025-02-09T11:38:39+5:302025-02-09T11:40:08+5:30

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताच्या वाटेवर असल्याचे दिसताच गोव्यासह देशभरात जल्लोष सुरू झाला.

people rejected a govt mired in corruption and arrogance said cm pramod sawant and bjp celebrates victory of delhi in goa | भ्रष्टाचार अन् अहंकारात बुडलेल्या सत्तेला जनतेने नाकारले: मुख्यमंत्री; दिल्लीतील विजयाचा गोव्यात आनंदोत्सव

भ्रष्टाचार अन् अहंकारात बुडलेल्या सत्तेला जनतेने नाकारले: मुख्यमंत्री; दिल्लीतील विजयाचा गोव्यात आनंदोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: आम आदमी पक्षाचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव, त्यात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यावरही ओढावलेली पराभवाची नामुष्की हा गोव्यातील आम आदमी पार्टीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. कारण, हायकमांड नेतेच पराभूत झाल्यामुळे आता स्थानिक नेत्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. तर, दुसरीकडे भाजपच्या गोटात कमालीचा उत्साह पसरला असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विजयाचा जल्लोष साजरा केला.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताच्या वाटेवर असल्याचे दिसताच गोव्यासह देशभरात जल्लोष सुरू झाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत काल साखळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विजय साजरा केला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, वास्कोचे आमदार दाजी साळकर, सर्वानंद भगत, भाजप नेते सिद्धार्थ कुंकळ्ळकर, सुलक्षणा सावंत, जिल्हा सदस्य गोपाळ सुर्लकर, सरचिटणीस कालिदास गावस, मंडळ अध्यक्ष रामा नाईक, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर यांच्यासह नगरसेवक, सरपंच, पंच सदस्य
यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आणि अहंकारी बनलेल्या आम आदमी पक्षाला दिल्लीकरांनी त्यांची जागा दाखवली. तसेच, काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडल्याचेही ते म्हणाले.

खोटेपणाला दिल्लीच्या जनतेने धडा शिकवत आम आदमी पक्ष व काँग्रेसचा धुव्वा उडविला आहे. या निवडणुकीत भाजपने निर्विवाद मिळवलेले यश हे भाजपवर असलेला विश्वास आहे. दिल्लीच्या विकासाला आता खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे. दिल्लीच्या विजयाने देशातील जनतेला भाजपचे नेतृत्व मान्य असल्याचे स्पष्ट होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मी स्वतः दिल्लीतील चार मतदारसंघांत प्रचार केला आहे. त्याचवेळी दिल्लीत भाजपला पूर्ण बहुमत मिळणार याची खात्री होती. लोकांना खोटी आश्वासन देऊन भ्रष्टाचारात बुडलेल्या आम आदमी पक्षाविरोधात लाट पसरली होती. यापुढे डबल इंजिन सरकार दिल्लीला मजबूत सरकार प्राप्त करून देताना प्रत्येक घरात समृद्धी आणण्यास वचनबद्ध असेल. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी तसेच गृहमंत्री अमित शाह चाणक्य नीती व जे. पी. नड्डा यांचे संघटन या बळावरच भाजपने दिल्लीत विरोधकांना पळता भुई थोडी केली. जवळपास २७ वर्षांनतर भाजपने बहुमताने दिल्लीत विजय मिळवला आहे. या विजयात आपले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचाही वाटा आहे. - दामू नाईक, प्रदेशाध्यक्ष.

 

Web Title: people rejected a govt mired in corruption and arrogance said cm pramod sawant and bjp celebrates victory of delhi in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.