जनतेला इव्हेंट्स नकोत, बेरोजगारांना नोकऱ्या द्या; लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 13:17 IST2025-04-06T13:16:30+5:302025-04-06T13:17:47+5:30

वीज, पाणी व रस्ते सुविधा नसल्यास चांगल्या कंपन्या येणे कठीण आहे. इस्पितळ प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू राहणे आवश्यक असल्याचे माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी ठामपणे सांगितले.

people do not want events give jobs to the unemployed said laxmikant parsekar | जनतेला इव्हेंट्स नकोत, बेरोजगारांना नोकऱ्या द्या; लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केल्या भावना

जनतेला इव्हेंट्स नकोत, बेरोजगारांना नोकऱ्या द्या; लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केल्या भावना

लोकमत न्यूज नेटवर्क, हरमल : मांद्रे मतदारसंघातील नियोजित मोपा विमानतळ प्रकल्प मार्गी लागला आणि महसूलप्राप्ती सुरू झाली. मात्र, तुये इस्पितळ, वीज उपकेंद्र, तेरेखोल पूल, इलेक्ट्रॉनिक सिटी आदींद्वारे हजारो रोजगार व नोकऱ्यांची उपलब्धी झाली असती. मात्र, ते पूर्ण होऊ शकले नाही. मांद्रेतील जनतेने कार्निव्हल, शिमगोत्सव इव्हेंट मागितले नाहीत, त्यांना स्वच्छ निसर्ग, पर्यावरण, पोलिसांची व गुंडाची दादागिरी नको. तसेच कमिशन राज होऊ नये, अशी अपेक्षा आहे. प्रत्येकाने आत्मपरीक्षण व जबाबदारी घेण्याची गरज आहे, असे मत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकारांशी व्यक्त केले.

वीज, पाणी व रस्ते सुविधा नसल्यास चांगल्या कंपन्या येणे कठीण आहे. त्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. तुये इस्पितळ १०० खाटांचे व गोवा मेडिकल कॉलेजशी संलग्न असणे आवश्यक आहे. त्यामुळे इस्पितळ प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू राहणे आवश्यक असल्याचे माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी ठामपणे सांगितले.

तुये इस्पितळाचा ज्या हेतूने आराखडा बनवला, त्यात तसूभरही बदल स्वीकारता येणे शक्य नाही. पेडणे तालुका हा पूर्वीचा तालुका राहिला नसून, महामार्ग, रेल्वे रोड व एअरवेज ह्या तिन्ही बाजूंनी परिपक्व आहे. लोकसंख्या वाढल्याने निश्चितच तीन मतदारसंघ होतील, असेही मत पार्सेकर यांनी मांडले.

केरी तेरेखोल पूल रखडला

या पुलासाठी ३० ते ३५ कोटी आजवर खर्च केले आहेत. आणखी काही कोटींची तरतूद केल्यास हा पूल पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे गोमंतकियांचा प्रवास सुखकर होईल. या पुलाचे काम माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी सुरू केले. काम अर्धवट असल्याने जनतेचा पैसा व्यर्थ जात आहे. त्यामुळे सरकारने त्याचा पाठपुरावा करावा, असेही पार्सेकर म्हणाले.

विमानतळ प्रशिक्षक केंद्र सुरू करावे

श्रेय घेणे आपणास आवडत नाही, मात्र विमानतळ प्रशिक्षक केंद्राची स्थापना न झाल्याने रोजगार संधी हुकल्या, याबद्दल पार्सेकर यांनी खेद व्यक्त केला. मात्र, लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून घेणे आवश्यक आहे. तुयेत वीज, पाणी प्रकल्पासाठी दहा हजार चौरस मीटर जागा ताब्यात घेतली, रूपांतरण केले, मात्र काम सुरू नाही. रस्त्यासाठी भूसंपादन आठ वर्षे रखडले. त्यासाठी आता प्रक्रिया सुरू केल्याचे सांगून जनतेची थट्टा करताना, स्वतः जबाबदारी घेण्याची गरज आहे, असे मत पार्सेकर यांनी व्यक्त केले.

जलवाहिनी घालण्याचे काम संथगतीने

तुयेतील ३० एमएलडी पाणी प्रकल्प आपल्या कार्यकाळातील प्रारंभापासून जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू करावे. सध्या २०० ते ५०० मीटरच्या भागात रस्ते खोदून जलवाहिन्या घालण्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र धुरळा होत असल्याने पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करावीत, असेही पार्सेकर म्हणाले.

मला कामाचे श्रेय नकोच

मांद्रे, केरी गावात दीन दयाळ भवन इमारत, तुये मैदान ही कामे आपल्या कार्यकाळात झाली. त्या प्रकल्पांच्या पाटीवर आपले नाव नसेल. आपणही आग्रही नाही. सध्या आपण भाजपपासून दोन पावले दूर आहे. भाजप पक्षाचा स्थापनेचा आपण एक घटक आहे, त्याचा मला अभिमान आहे. मात्र, एखाद्या व्यक्तीविषयी मतभेद असू शकतात, आपल्याकडून चुकाही झाल्या असतील. मात्र, पक्षाकडे आपली दुष्मनी नाही, असेही पार्सेकर म्हणाले.

जनसंपर्क वाढवण्याला प्राधान्य

सध्या आपण जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. शैक्षणिक संस्थेचा विस्तार, विकासकामांत आपण मग्न आहे. मात्र, पुढील निवडणुकीबाबत आताच भाष्य करणे अवघड असल्याचे मत पार्सेकर यांनी व्यक्त केले.

 

Web Title: people do not want events give jobs to the unemployed said laxmikant parsekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.