सनबर्नविरोधात जनता रस्त्यावर आलीच नाही, म्हणून मी नाही गेलो: प्रवीण आर्लेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2025 07:40 IST2025-01-03T07:40:31+5:302025-01-03T07:40:31+5:30
विरोध करणारे महोत्सवात सहभागी झाल्याने आश्चर्य

सनबर्नविरोधात जनता रस्त्यावर आलीच नाही, म्हणून मी नाही गेलो: प्रवीण आर्लेकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : सनबर्न ईडीएमला स्थानिकांनी विरोध केल्यामुळेच आपण आपण रस्त्यावर येऊन जाहीर सभा घेतली आणि विरोध दर्शवला. मात्र, तीन दिवस झालेल्या महोत्सवावेळी कुणीही विरोध दर्शवण्यासाठी रस्त्यावर आलेच नाहीत. त्यामुळे आपणही रस्त्यावर आलो नाही, असे स्पष्टीकरण आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिले. आता हा महोत्सव यशस्वी झाला, त्यामुळे यावर अधिक भाष्य करणे बरोबर नव्हे, असेही ते म्हणाले.
ज्या दिवशी धारगळ पंचायत क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्स महोत्सवाचे आयोजन केल्याच्या बातम्या विविध प्रसार माध्यमांतून प्रसारित झाल्या. त्याची गंभीर दखल घेत आमदार आर्लेकर यांनी पेडणे मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य, नागरिक, भाजपचे कार्यकर्ते, समर्थकांची जाहीर सभा धारगळ पंचायत कार्यालयासमोर झाली होती. केवळ पेडणे मतदारसंघातीलच नव्हे, तर माद्रे मतदारसंघातील काही आजी- माजी सरपंच उपसरपंच नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महोत्सवाला आमचाही पूर्णविरोध असल्याचे जाहीर केले होते. तर त्याच दिवशी दुसऱ्या बाजूने धारगळ पंचायत मंडळाची सत्तारूढ गटाची एक बैठक होऊन त्या बैठकीमध्ये या महोत्सवाला पूर्णपणे पाठिंबा देण्याचेही जाहीर केले. त्याचवेळी नागरिकांच्या लक्षात आले की, या महोत्सवावरून धारगळ पंचायत क्षेत्रात दोन गटत निर्माण झाले.
मात्र, धारगळ येथे झालेल्या विरोधकांच्या सभेत आमदार आर्लेकर यांनी सनबर्न महोत्सव आपण कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. जर महोत्सव सुरू झाला, तर आपण तो उधळून लावू, असा इशारा दिला होता. महोत्सवाला विरोध करणाऱ्यांनी शेवटपर्यंत आपला विरोध दर्शवला नाही किंवा तो उधळूनही लावला नाही. त्यासंदर्भात आता मतदारसंघात चर्चा रंगू लागली आहे.
ग्रामस्थांना पास कुणी दिले?
या महोत्सवाला विरोध करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, पंच, नागरिक सभेला उपस्थित होते. त्यातील अनेकजण महोत्सवात सहभागी झाल्याचे उघड झाले. त्यांना कोणी पास दिले. त्यांनी कोणत्या नेत्यांकडून प्रवेश मिळवला, याची माहिती मात्र उपलब्ध होत नाही.
आमदार आर्लेकर यांच्याकडून होती मोठी अपेक्षा
आमदार प्रवीण आर्लेकर यांनी ज्या पद्धतीने सुरुवातीपासून महोत्सवाला विरोध दर्शवला आणि वेळोवेळी पत्रकारांनी त्यांच्याकडे संपर्क साधून त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, आपण दिलेला शब्द हा शेवटपर्यंत सत्य ठरवणार. परंतु तो शब्द सत्य ठरला नाही. आमदार आर्लेकर यांच्याकडून नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. निदान महोत्सवाच्या दिवशी तरी ते रस्त्यावर येतील आणि महोत्सवाला विरोध करतील, अशी लोकांची अपेक्षा होती. परंतु या महोत्सवाच्या विरोधासाठी लोकच आले नसल्याने आपणही रस्त्यावर उतरलो नाही, असेही आर्लेकर म्हणाले.