पक्षश्रेष्ठी जबाबदारी देतील, ती स्वीकारण्यास तयार: सदानंद तानावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2025 08:13 IST2025-01-12T08:12:36+5:302025-01-12T08:13:11+5:30
२० जानेवारीपर्यंत नव्या अध्यक्षांची निवड शक्य

पक्षश्रेष्ठी जबाबदारी देतील, ती स्वीकारण्यास तयार: सदानंद तानावडे
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे. सामान्य कार्यकर्ता ते वरिष्ठ नेता हे सर्वच लोक प्रामाणिकपणे पक्षासाठी कार्यरत असतात. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे. या दरम्यान सर्वांचे चांगले सहकार्य मला लाभले.
नवीन अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू असून २० जानेवारीपर्यंत नव्या अध्यक्षांची निवड केंद्रातून होईल, अशी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार सदानंद शेट तानवडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. येथील एका कार्यक्रमासाठी खासदार तानावडे आले असता, त्यांना राज्य प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात विचारले असता त्यांनी पक्ष जी जबाबदारी देईल, ती इमाने इतबारे सांभाळण्यासाठी आम्ही कार्यकर्ता या नात्याने कटिबद्ध आहोत.
प्रदेशाध्यक्षपदी तुमच्या नावाची शिफारस काहींनी केली आहे, त्या संदर्भात विचारले असता त्यांनी पक्ष यासंदर्भात निर्णय घेणार आहे. अध्यक्षपदासाठी काही नावे दिलेली असून यासंदर्भात सल्लामसलत होऊन नव्या अध्यक्षांची निवड होईल.
पक्षसंघटन मजबुतीसाठी निवड प्रक्रिया सुरू
भाजपची संघटन बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी देश पातळीवर वेगवेगळ्या निवडी सुरू आहेत. गोव्यातही उत्तर व दक्षिणमध्ये अध्यक्षांची बिनविरोध निवड झालेली आहे. सर्व गटप्रमुख तसेच सर्व प्रभागांची निवड झालेली आहे. अध्यक्षांची निवड ही त्याच गतीने व सर्वांना विश्वासात घेऊन केली जाणार आहे. भाजपचे डबल इंजिन सरकार देशाला वैभवाच्या शिखरावर नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. आगामी काळातही भाजप अधिक भक्कम करण्याचा संकल्प ठेवून आमचे कार्य सुरू असल्याचे तानावडे यांनी सांगितले.