भाजपचे गट अध्यक्ष, सरचिटणीस यापुढे पक्षनिष्ठच निवडण्याचा पक्षाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2024 13:00 IST2024-11-28T13:00:14+5:302024-11-28T13:00:53+5:30
आमदारांच्या मर्जीनुसार संघटना चालणार नाही : जानेवारीत निवड प्रक्रिया

भाजपचे गट अध्यक्ष, सरचिटणीस यापुढे पक्षनिष्ठच निवडण्याचा पक्षाचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजपची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत होणार आहे. जानेवारी महिन्यात भाजपचे मंडल तथा गट अध्यक्ष आणि सरचिटणीस निवडले जाणार आहेत.
चाळीसही विधानसभा मतदारसंघांमध्ये ही प्रक्रिया होईल. मात्र, यापुढे सरचिटणीस व मंडल अध्यक्ष हे पक्षनिष्ठच निवडले जाणार आहेत. तसा निर्णय झालेला आहे. मंत्री-आमदारांच्या मर्जीनुसार संघटनेतील पदांचे वाटप होणार नाही.
देशभर नवी पद्धत स्वीकारण्याचे भाजपने ठरवले आहे. केवळ गोव्यातच नव्हे तर देशभर संघटनेच्या हिताच्या दृष्टीने नवी पद्धत स्वीकारली जाणार आहे. काँग्रेस पक्षात आमदारांच्या मर्जीनुसार गट अध्यक्ष वगैरे निवडले जातात. त्यामुळे आमदार फुटला की महत्त्वाचे पदाधिकारीही आमदारासोबत पक्ष सोडून जातात. भाजपबाबतही काही राज्यांत यापूर्वी तसे घडले आहे. त्यामुळे आता पक्षाची संघटनात्मक निवडणूक घेताना पक्षनिष्ठ कार्यकर्ताच सरचिटणीस व मंडल अध्यक्ष होईल याची काळजी घेतली जाणार आहे. भाजपच्या काही जबाबदार नेत्यांनी या माहितीला दुजोरा दिला.
दरम्यान, गोव्यात येत्या महिन्यात संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. जानेवारीत मंडल अध्यक्ष व सरचिटणीस वगैरे निवडले जातील. आमदार व मंत्र्यांकडे अध्यक्ष व सरचिटणीसपदासाठी चार, पाच नावे मागितली जातील. पण, त्यापैकी कोण खरा पक्षनिष्ठ कार्यकर्ता आहे ते शोधून काढून त्याचीच निवड केली जाणार आहे. समजा आमदाराने पक्षनिष्ठाचे नाव दिले नाही तर त्या चार-पाच नावांच्या बाहेरील कार्यकर्त्याची देखील सरचिटणीस किंवा मंडल अध्यक्ष म्हणून निवड केली जाईल, असे पक्ष सूत्रांनी सांगितले. गोव्यात भाजपची सदस्य नोंदणी मोहीम राबविताना काही अवघ्याच आमदारांनी पक्षाला सहकार्य केले नाही. याची दखलही पक्षाने घेतली आहे.