गोवा बनतोय गुन्हेगारांचे नंदनवन
By Admin | Updated: June 16, 2014 02:01 IST2014-06-16T01:59:54+5:302014-06-16T02:01:37+5:30
गोवा बनतोय गुन्हेगारांचे नंदनवन

गोवा बनतोय गुन्हेगारांचे नंदनवन
सूरज पवार-मडगाव : गुन्हेगारांसाठी गोवा नंदनवन बनत आहे. दोन दिवसांपूर्वी मडगाव पोलीस स्थानकाच्या एलआयबी पोलीस पथकाने मूळ मणिपूर येथील दोघांना गजाआड केले. नोकरीच्या निमित्ताने गोव्यात आलेल्या अरबाज खान व रुफियत अली या दोघांनी चोरीचा मार्ग पत्करला व शेवटी त्यांना तरुंगाची हवा खावी लागली. सुशेगाद गोवा या गुन्हेगारांसाठी ‘आओ जाओ घर तुम्हारा’ असाच झाला आहे.
८0 च्या दशकात पर्वरी येथील ओ कोकेरो या हॉटेलात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्ल्स शोभराज याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्या वेळी प्रथमच गोवा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी क्षेत्रात चमकला होता. त्यानंतर मडगावात फ्रेडी पिट्स प्रकरण घडले. बाल लैंगिक अत्याचाराच्या या प्रकरणाने गोवा ढवळून निघाला होता. त्यानंतर मांडवी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून, गेल्या काही वर्षांत या राज्यात बोकाळलेली गुन्हेगारी बघता गोवा आता गुन्हेगारी क्षेत्रातही पिछाडीवर राहिले नाही हे विदारक सत्य आता सुशेगाद गोवेकरही पचवू लागला आहे.
दोन वर्षांपूर्वी कासावली येथे नक्षलवाद्यांना पोलिसांनी गजाआड केले होते. भाड्याने घर घेऊन ही मंडळी गोव्यात बिनधास्त राहात होती. गोव्यात भाडेकरू ठेवल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे. मात्र, त्याची पूर्तता होत नसल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे.
मंगला एक्सप्रेसमध्ये बॉम्ब साहित्य घेऊन आलेला काश्मिरी आंतकवादी तारीक अहमद बाटलू याला मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकात काही वर्षांपूर्वी अटक केली होती. पोलीस तपासात बाटलू हा शिरवडे येथे एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहात होता, असे आढळून आले होते. हेडली हा आंतकवादीही गोव्यात येऊन रेकी करून गेल्याचे सिध्द झाले होते. तर इंडियन मुजाहिदीनचा कुविख्यात आतंकवादी यासीन भटकळ हाही गोव्यात वास्तव्यास होता, असे पोलीस तपासात आढळून आले होते.
गेल्या महिन्यात कामराभाट येथे एका घरात गावठी बॉम्बचा स्फोट होऊन पपलू मलगुंड हा ठार झाला होता. मयताला भाडेकरू म्हणून ठेवताना घरमालकिणीने कुठलीही खबरदारी घेतली नव्हती, असे पोलीस तपासात आढळून आले आहे.
गोव्यासाठी आता गुन्हेगारी नवीन राहिली नाही. दिवसागणिक येथे खून, दरोडे प्रकरणांची नोंद होत आहे. ४ जून रोजी केरी-सत्तरी येथील सावित्री झोरे या विवाहितेचा चारित्र्याच्या संशयावरून तिच्या नवऱ्यानेच खून केला. या प्रकरणी संशयित सध्या पोलीस कोठडीत आहे. (प्रतिनिधी)