पेपरफुटीची होणार चौकशी: गोवा विद्यापीठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 07:52 IST2025-03-17T07:51:43+5:302025-03-17T07:52:34+5:30
घटनेविषयी कुलगुरू अनभिज्ञ; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पोलिसांत तक्रार

पेपरफुटीची होणार चौकशी: गोवा विद्यापीठ
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी:गोवाविद्यापीठात एका प्रोफेसरने आपल्या एका खास विद्यार्थिनीसाठी प्रश्नपत्रिका चोरल्याच्या प्रकाराची चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या पेपरफुटीच्या प्रकरणात चौकशी करणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. हरिलाल मेनन यांनी म्हटले आहे.
या प्रकाराविषयी कुलगुरू मेनन यांना विचारले असता या प्रकरणाबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. मेनन म्हणाले की, रविवार, सुटीचा दिवस असल्यामुळे सध्या याबाबतीत काहीच करणे शक्य नाही. सोमवारी या प्रकरणात लक्ष घालून चौकशी केली जाईल.
विद्यापीठातील प्रश्नपत्रिकेची चोरी केल्याच्या या प्रकरणाने विद्यापीठाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. विद्यापीठाच्या घसरलेल्या मानांकनावरूनही शैक्षणिक वर्तुळात नाराजी आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमात याविषयी बोलताना कुलगुरूंना स्पष्ट शब्दात सुनावलेही होते. आता या प्रकरणात सरकारची भूमिका काय राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, या प्रकरणात तक्रार का नोंद करण्यात आलेली नाही? बीएड महाविद्यालय असलेल्या एका माजी मंत्र्यांनी हस्तक्षेप का केला? असे मुद्दे सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केले आहेत. तर पेपर गळती करणारा तो प्राध्यापक आणि त्या बेजबाबदार विद्यार्थिनीला त्वरित शिक्षा झाली पाहिजे. विद्यापीठ प्रशासन जर कारवाई करण्यास अपयशी ठरले, तर आम्ही विद्यार्थी रस्त्यावर उतरू असा इशारा अभाविपने दिला आहे.
कुलगुरूंनी फेटाळला तंबीचा आरोप
प्रश्नपत्रिका चोरण्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या प्रोफेसरला कुलगुरूंनी केवळ तंबी देऊन सोडले असेही सांगितले जाते. मात्र, याविषयी विचारले असता कुलगुरू मेनन यांनी हे आरोप फेटाळले. आपल्याला याविषयी काही ठाऊक नसल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण व्यवस्थेवर डाग : अभाविपची टीका
गोवा विद्यापीठातील शिक्षणाचे पावित्र्य धुळीला मिळाले आहे. विद्यापीठ प्रशासन, कुलगुरूंमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. पेपर फुटीच्या प्रकरणाने शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासला आहे अशी टीका अभाविपने केली आहे. कुलगुरूंनी तंबीवर प्रकरण रोखले हे खपवून घेतले जाणार नाही. हा परीक्षा पद्धतीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह आहे. कुलगुरूंनी जर हे गंभीर प्रकरण हाताळले नाही, तर विद्यार्थ्यांच्या रागाचा उद्रेक होईल, असा इशारा विद्यार्थी परिषदेचे माजी सचिव सुधीर नाईक यांनी दिला आहे.
शेट्ये यांच्यासह सात जणांकडून तक्रार सादर
गोवा विद्यापीठातील पेपर चोरीप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांच्यासह ७ जणांनी आगशी पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणात चौकशीची मागणी करण्यात आली आहे. आगशी पोलिस स्थानकात केलेल्या तक्रारीत प्रोफेसर प्रणव नाईक यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. पेपर चोरीप्रकरणी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आहेत. त्यानुसार, पेपरची चोरी नेमकी कशी झाली?, भौतिकशास्त्र विभागप्रमुख यावर गप्प का राहिले?, पेपरची चोरी उघडकीस आल्यानंतर पेपर का बदलण्यात आला नाही? अशी विचारणा करण्यात आली आहे. याशिवाय विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या भूमिकेची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.