पणजीत आज मतदारराज
By Admin | Updated: February 13, 2015 01:14 IST2015-02-13T01:10:46+5:302015-02-13T01:14:22+5:30
पणजी : गेली वीस वर्षे पणजी मतदारसंघावर राज्य करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आता पुन्हा एकदा पणजीवासीय कौल देतात की नाही,

पणजीत आज मतदारराज
पणजी : गेली वीस वर्षे पणजी मतदारसंघावर राज्य करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आता पुन्हा एकदा पणजीवासीय कौल देतात की नाही, हे शुक्रवारी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या मतदान प्रक्रियेतून ठरणार आहे. भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर, विरोधी काँग्रेसचे उमेदवार सुरेंद्र फुर्तादो यांच्यासह अपक्ष उमेदवार समीर केळेकर यांनीही विजयाचा दावा केला आहे.
शुक्रवारी सकाळी आठ वाजता पणजी मतदारसंघातील ३० मतदान केंद्रांवरून मतदानाच्या प्रक्रियेस आरंभ होईल. गुरुवारी सायंकाळी पोलीस बंदोबस्तात इलेक्ट्रॉनिक यंत्रे मतदान केंद्रांवर पोहोचती करण्यात आली. पणजी मतदारसंघात एकूण २२ हजार ५७ मतदार आहेत. २०१२ साली पणजीत ७७.१३ टक्के, तर २०१४च्या लोकसभा निवडणुकीवेळी ७३.२७ टक्के मतदान झाले होते. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गेल्या वर्षाच्या अखेरीस आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे पणजीत पोटनिवडणूक होत आहे.
एकूण चार उमेदवार रिंगणात आहेत. त्यात भाजपचे सिद्धार्थ कुंकळ्येकर, काँग्रेसचे सुरेंद्र फुर्तादो तर समीर केळेकर व सदानंद वायंगणकर या दोन अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. कुंकळ्येकर, केळेकर व वायंगणकर हे प्रथमच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. पर्रीकर यांच्या मागे भाजपचे सगळे कार्यकर्ते व समर्थक ठामपणे उभे राहायचे. त्या तुलनेत कुंकळ्येकर यांना पाठिंबा कमी आहे; पण पर्रीकर त्यांच्या मागे ठामपणे उभे असल्याने ते तुल्यबळ उमेदवार मानले जातात. काँग्रेसच्या तुलनेत पणजीत भाजपची पक्ष संघटना बळकट आहे.
काँग्रेसचा गेल्या वीस वर्षांत एकदाही पणजीत विजय झाला नाही. मात्र, काँग्रेसचे उमेदवार फुर्तादो यांना अल्पसंख्याकांमध्ये बऱ्यापैकी स्थान आहे. पणजीत ६ हजार ख्रिस्ती मतदार आहेत. शिवाय मुस्लिम मतदारांची संख्या १२00 आहे. काँग्रेसनेही प्रचार कार्य बऱ्यापैकी केले आहे. भाजपचे कुंकळ्येकर यांनीही घरोघर जाऊन खूप जोरात प्रचार काम पार पडले. भाजप व काँग्रेस अशी कडवी लढत असल्याचे चित्र शेवटच्या टप्प्यात उभे राहिले आहे. पर्रीकर हे २०१२ साली साडेपाच हजार मतांची आघाडी घेऊन विजयी झाले होते. (खास प्रतिनिधी)