पणजीत ७१ टक्के मतदान
By Admin | Updated: February 14, 2015 03:48 IST2015-02-14T03:38:24+5:302015-02-14T03:48:30+5:30
पणजी : भाजप आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या पणजी विधानसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी झालेल्या पोटनिवडणुकीची

पणजीत ७१ टक्के मतदान
पणजी : भाजप आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या पणजी विधानसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी झालेल्या पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. एकूण २२ हजार ५७ मतदारांपैकी १५ हजार ७0४ म्हणजेच ७१.२0 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पोटनिवडणुकीच्या रिंगणातील चारही उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांत बंद झाले आहे. येत्या सोमवारी पणजीतील ईएसजी इमारतीत मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
सकाळी आठ वाजता पणजी मतदारसंघातील तीसही मतदान केंद्रांवरून कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रियेस आरंभ झाला. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर तसेच भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर व काँग्रेसचे उमेदवार सुरेंद्र फुर्तादो यांनी सकाळीच मतदान केले. पर्रीकर यांनी मासान दी आमोरीम भागातील मतदान केंद्रावर सर्वप्रथम जाऊन मतदानाचा हक्क बजावला. कुंकळ्येकर यांनी बोक द व्हाक येथील वन खात्याच्या कार्यालयाजवळ असलेल्या मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. फुर्तादो यांनी कांपाल येथील गृह विज्ञान महाविद्यालयातील जागेत असलेल्या केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. पर्रीकर हे संरक्षणमंत्री असले, तरी ते रांगेत उभे राहिले व मतदान केले.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याबद्दल संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी समाधान व्यक्त केले. एकाही इलेक्ट्रॉनिक यंत्रात बिघाड झाला नाही, असे त्यांनी सांगितले.
सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मार्च २०१२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पणजीत ७७.१३ टक्के मतदान झाले होते. त्या वेळी मनोहर पर्रीकर हे भाजपचे उमेदवार होते. आता २0 वर्षांनंतर प्रथमच पर्रीकर हे उमेदवार या नात्याने थेट रिंगणात नसताना पणजीत निवडणूक झाली. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी पणजी मतदारसंघात ७३.२७ टक्के मतदान झाले होते. त्या वेळी काँग्रेसला पणजीत साडेचार हजार मते प्राप्त झाली होती. भाजपला अकरा हजारपेक्षा जास्त मते मिळाली होती. पणजीत पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. शुक्रवारीही मोठ्या संख्येने महिलांनी मतदानात भाग घेतला.
सकाळी अकरा वाजेपर्यंत ३२ टक्के मतदान झाले होते. दहा वाजेपर्यंत हे प्रमाण २५ टक्के होते. चार वाजेपर्यंत ६४ टक्के मतदारांनी मतदान केले होते. पाच वाजेपर्यंत हे प्रमाण ६९ टक्क्यांपर्यंत पोहोचले. वयोवृद्ध नागरिकही मोठ्या संख्येने मतदानासाठी सकाळपासूनच घराबाहेर आले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सर्वत्र लक्ष ठेवले होते. पोलिसांची वाहनेही शहरात फिरत होती. (खास प्रतिनिधी)