लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : उत्तर गोव्यातील दोन दुकानांच्या फलकावर एलईडी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा झळकल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कळंगुट व हणजूण पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मंगळवारी संध्याकाळी बागा आणि हडफडे या परिसरात असणाऱ्या दोन दुकानांच्या एलईडी फलकांवर 'पाकिस्तान झिंदाबाद' अशा घोषणा दिसल्याची तक्रार स्थानिकांनी केली. पोलिसांनी याची दखल घेत तातडीने घटनास्थळ गाठले. त्यानंतर या दोन्ही दुकानांशी संबंधित नऊ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी हडफडे येथील रंचित भाटिया, विपिन पहुजा (दोघेही हरियाना), विनय चंद्रा राव, कृष्णा लमाणी (दोघेही कर्नाटक) व मनोज कुमार (बिहार) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर बागा येथील प्रकरणात कळंगूट पोलिसांनी महम्मद फरान, महम्मद साहवेज (दोघेही उत्तर प्रदेश), नौषाद कासीम (दिल्ली) व राकेश दास (कळंगूट) यांचा समावेश आहे.
कठोर कारवाई होणार : मुख्यमंत्री
हडफडे आणि बागा येथे 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा ज्या दुकानांच्या फलकावर झळकल्या त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. परवानगीशिवाय हे बोर्ड लावण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती चिघळण्यापूर्वी फलक बंद केला. या प्रकरणाची कसून चौकशी करत संबंधितांवर कठोर करवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
'हॅकर्स'चा डाव ?
कळंगुट व हणजूण पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही दुकानातील एलईडी फलक सिस्टीम हॅक केल्याचा संशय व्यक्त केला आहे. संबंधितांनी जाणूनबुजून 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा झळकवल्या नसल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, सायबर विभागाच्या मदतीने या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे.
वीज कनेक्शन तोडले
कळंगूट व हणजूण पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने घटनास्थळ गाठले. यावेळी बागा येथून चौघांना तर हडफडे येथून पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी दोन्ही दुकानांवरील डिजिटल फलकाचे वीज कनेक्शन तोडण्यात आले असून भारतीय न्याय संहिता कलम १५२ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा नोंदवला आहे.
Web Summary : Goa shops displayed 'Pakistan Zindabad' slogans. Police detained nine. Inquiry suggests hacking. Chief Minister ordered strict action. Investigation is ongoing.
Web Summary : गोवा की दुकानों पर 'पाकिस्तान जिंदाबाद' के नारे लगे। पुलिस ने नौ लोगों को हिरासत में लिया। जांच में हैकिंग का शक। मुख्यमंत्री ने सख्त कार्रवाई का आदेश दिया। जांच जारी है।