गोव्यात लवकरच सेंद्रिय कृषी विद्यापीठाची स्थापना- बाबू कवळेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 19:28 IST2020-01-31T19:28:41+5:302020-01-31T19:28:49+5:30

गोवा सेंद्रिय शेतीचे हब बनविण्याचा संकल्प सोडलेल्या गोवा सरकारकडून राज्यात सेंद्रीय कृषी विद्यापीठ सुरू करण्याचे ठरविले आहे.

Organic Agricultural University soon established in Goa | गोव्यात लवकरच सेंद्रिय कृषी विद्यापीठाची स्थापना- बाबू कवळेकर

गोव्यात लवकरच सेंद्रिय कृषी विद्यापीठाची स्थापना- बाबू कवळेकर

मडगाव: गोवा सेंद्रिय शेतीचे हब बनविण्याचा संकल्प सोडलेल्या गोवा सरकारकडून राज्यात सेंद्रीय कृषी विद्यापीठ सुरू करण्याचे ठरविले आहे. सोमवारपासून सुरू होणा-या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यावेळी मुख्यमंत्र्यांकडून या संबंधी घोषणा होणार आहे. कृषिमंत्री बाबू कवळेकर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. ते म्हणाले, गोव्यात सेंद्रिय शेतीला उत्तेजन देण्याचा सरकारचा मानस आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे विद्यापीठ गोव्यात सुरू करण्याचे ठरविले आहे. या विद्यापीठात सेंद्रिय शेतीच्या अभ्यासाबरोबरच नवीन संशोधनाला चालना देण्यात येणार आहे. याशिवाय गोव्यातील सेंद्रिय उत्पादनाचे या विद्यापीठाकडून प्रमाणपत्रे दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नुवे व वेर्णा या भागातील शेतक-यांनी घेतलेल्या कलिंगडाच्या पिकाला कीड लागल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी कवळेकर शुक्रवारी या भागात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी नवीन विद्यापीठाचे सूतोवाच केले. यासाठी केंद्र सरकारकडूनही भरीव मदत  दिली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

ज्या भागात किडीचा प्रादुर्भाव होऊन कलिंगडांच्या पिकांची नासाडी झाली, त्याचा संपूर्ण आढावा घेण्याचे आदेश आपण कृषी संचालकांना दिले आहेत. गोव्यात पहिल्यांदाच असा प्रकार घडत आहे. शेतक-यांकडून औषध फवारणी होऊनही पिकाला कीड लागली. त्यामुळे ही कीड कशी लागली यासंबंधीही संशोधन केले जाणार असल्याचे ते म्हणाले. या शेतक-यांना योग्य ती नुकसानभरपाई दिली जाईल, असेही कवळेकर यांनी सांगितले. यावेळी त्यांच्याबरोबर नुवेचे आमदार विल्फ्रेड (बाबाशान) डिसा हे उपस्थित होते.

Web Title: Organic Agricultural University soon established in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.