लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : अवयवदान हे श्रेष्ठ दान असून याविषयी लोकांमधील गैरसमज दूर झाला पाहिजे. ब्रेन डेड झालेली एक व्यक्ती अवयव दानातून आठ जणांना जीवदान देऊ शकते. ७५ जणांना 'टिशू' (उती) दान करून विविध प्रकारे मदत करू शकते. त्यामुळे याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे, असे मत 'स्टेट ऑर्गन अॅण्ड टिशू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन गोवा' (सोटो) या संस्थेच्या कन्सल्टंट श्रद्धा केळकर यांनी व्यक्त केले.
येथील लोकमत कार्यालयातर्फे अवयवदानाविषयी आयोजित जागृती कार्यक्रमात त्या मार्गदर्शन करत होत्या. त्यांच्यासोबत सोटोच्या प्रतीक्षा नाईक आणि अनिरुद्ध विर्नोडकर उपस्थित होते. यावेळी लोकमतचे वरिष्ठ महाव्यवस्थापक संदीप गुप्ते, संपादक सद्गुरु पाटील, एचआर विभाग प्रमुख विराज चौगुले व इतर विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी केळकर यांनी अवयव दानाविषयी अधिक जागृती करण्याची गरज व्यक्त केली.
अवयवदान हे दोन प्रकारचे असते. एक जिवंत अवयवदान आणि दुसरे मृत अवयवदान. जिवंत अवयवदानात व्यक्ती जिवंत असताना कुटुंबातील व्यक्तीला किडनी तसेच इतर काही अवयव दान करू शकतो. पण अन्य कोणाला अवयव दान करू शकत नाही. मृत अवयवदान म्हणजे ब्रेन डेड झालेली व्यक्तीचे अवयव दान. हे मृताच्या कुटुंबाच्या परवानगीने होते
राज्यात ८ व्यक्तींचे अवयव दान
राज्यात आतापर्यंत ब्रेन डेड झालेल्या ८ व्यक्तींचे अवयव दान झाले आहेत. त्यात एका गोमंतकीय व्यक्तीचा समावेश आहे. राज्यात गोवा वैद्यकीय महाविद्यालय व अन्य दोन खासगी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण करण्याची सोय आहे. इतर अवयव हे परराज्यात आवश्यकता असलेल्या रुग्णांना दिल्या जातात. हे अवयव वेळेत गरजू रुग्णांपर्यंत पोहोचविण्यासाठी 'ग्रीन कोरिडोअर' असतो. ते अवयव घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अतिमहनीय व्यक्तीच्या ताफ्याप्रमाणे सुरक्षा व्यवस्था पुरविली जाते. त्यामुळे ते अवयव वेळेत, सुरक्षित पोहोचतात, अशी माहिती श्रद्धा केळकर यांनी यावेळी दिली.