२५ वर्षीय 'ब्रेनडेड' मजुराच्या अवयवदानाने पाच जणांचे वाचले जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2025 12:14 IST2025-01-29T12:13:59+5:302025-01-29T12:14:27+5:30

मंत्री राणेंनी घेतली मुलाची जबाबदारी

organ donation from 25 year old brain dead laborer saves five lives | २५ वर्षीय 'ब्रेनडेड' मजुराच्या अवयवदानाने पाच जणांचे वाचले जीव

२५ वर्षीय 'ब्रेनडेड' मजुराच्या अवयवदानाने पाच जणांचे वाचले जीव

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : एका अत्यंत हृदयस्पर्शी घटनेत जबलपूर (मध्य प्रदेश) येथील २५ वर्षीय कामगार गोविंद यादव यांच्या कुटुंबाने अवयवदानाद्वारे पाच जणांना नवीन जीवन दिले आहे. डिचोली येथील एका बांधकाम प्रकल्पात काम करणारा यादव हिट अँड रन अपघातात गंभीर जखमी झाला होता आणि त्याला उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले होते.

गोमेकॉतील डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केल्यानंतर, यादव यांच्या कुटुंबाने त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. गोमेकॉत ३५ आणि ३६ वर्षीय दोन महिलांमध्ये त्याची मूत्रपिंडे यशस्वीरीत्या प्रत्यारोपित करण्यात आली. मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात त्याचे हृदय ५५ वर्षीय पुरुषाला देण्यात आले, तर अहमदाबादमधील झायडस रुग्णालयात त्याचे यकृत ३९ वर्षीय पुरुषाला प्रत्यारोपित करण्यात आले. यादव यांचे फुफ्फुस राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संघटना (नाटो) द्वारे दिल्लीतील अपोलो रुग्णालयात वाटप करण्यात आले. गोमेकॉ रुग्णालयात मेंदू मृत झालेल्या रुग्णाच्या अवयवदानाची ही सहावी घटना आहे.

या तरुणाच्या बलिदानाचे मूल्य करता येणार नाही. कारण पाच कुटुंबांना जीवनाची दुसरी संधी या तरुणामुळे मिळाली आहे. तसेच या घटनेमुळे इतरांना अवयवदानाची प्रेरणा मिळेल अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त करताना मृताच्या पत्नीचे वैयक्तिकरीत्या आभार मानले.

मंत्री राणेंनी घेतली मुलाची जबाबदारी

मृत गोविंदला २ वर्षांचा मुलगा असून त्याची जबाबदारी आता त्याची पत्नी जागृती हिच्यावर आली आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी यादव यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी आपल्या खासगी ट्रस्टमार्फत घेत असल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.

ग्रीन कॉरिडोर बनविला

दान केलेले अवयव हे दात्याच्या शरीरातून काढण्यात आल्यावर त्याची ज्या ठिकाणी रोपण शस्त्रक्रिया होणार आहे त्या ठिकाणी कमीत कमी वेळेत आणि सुरक्षित स्थितीत पोहोचणे आवश्यक असते. त्यासाठी वाहतुकीदरम्यान अडथळा येऊ नये यासाठी ग्रीन कॉरिडोर बनविला जातो. गोवा पोलिस आणि १०८ रुग्णवाहिका सेवेच्या मदतीने गोमेकॉ ते विमानतळापर्यंत तीन ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले. हृदय आणि यकृत मोपा विमानतळावरून नेण्यात आले, तर फुफ्फुस दाबोळी विमानतळावरून नेण्यात आले, अशी माहिती गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.
 

Web Title: organ donation from 25 year old brain dead laborer saves five lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा