गोमेकॉत ओपीडी नोंदणी होणार ५० टक्के ऑनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2025 10:27 IST2025-02-12T10:26:22+5:302025-02-12T10:27:13+5:30
गोमेकॉतील अनेक विभाग असे आहेत, की ज्या विभागांत फार मोठ्या प्रमाणावर ताण असतो.

गोमेकॉत ओपीडी नोंदणी होणार ५० टक्के ऑनलाइन
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोवावैद्यकीयमहाविद्यालय इस्पितळातील (गोमेकॉ) दैनंदिन ओपीडी नोंदणी ऑनलाईन करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला जाणार आहे. लांब अंतरावरून येणाऱ्या रुग्णांचा विचार करून ५० टक्के नोंदणी ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गोमेकॉतील अनेक विभाग असे आहेत, की ज्या विभागांत फार मोठ्या प्रमाणावर ताण असतो. ओपीडीत येणाऱ्या रुग्णांची संख्या फार मोठी असते. त्यामुळे लांब अंतरावरून येणाऱ्या रुग्णांची अधिक गैरसोय होते.
हृदयरोग विभागात तर ओपीडीसाठी दररोज केवळ १०० रुग्णांनाच क्रमांक दिले जातात. हे क्रमांक सकाळी ८ ते ८.३० वाजेपर्यंत संपतात. त्यामुळे त्यानंतर आलेल्या रुग्णांना ओपीडीत प्रवेश मिळत नाही. त्यामुळे त्यांना निराश होऊन परत जावे लागते. अशा लोकांसाठी ही ऑनलाईन नोंदणी दिलासादायक ठरणार आहे.
आता सकाळी आठपूर्वी टोकन मिळणारच नाही
गोवावैद्यकीयमहाविद्यालय इस्पितळाच्या सुपर स्पेशलिटी विभागात ओपीडीसाठी येणाऱ्या रुग्णांना टोकन देण्याची सुरुवात सकाळी आठ वाजताच केली जाईल, याला पुष्टी देणारा आदेश गोमेकॉने जारी केला. सुपर स्पेशालिटी विभागात रुग्णांना ओपीडीसाठी सुरुवातीला टोकन घेणे आवश्यक आहे.
तपासणीसाठी टोकन सक्तीची सुरुवात दोन वर्षांपूर्वी करण्यात आली. परंतु, टोकन मिळवण्यासाठी लोक सकाळी पाच वाजल्यापासूनही येऊन बसू लागल्याचे आढळून आल्यामुळे टोकन किती वाजता द्यावे याविषयी विचार करून निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणीही मागील एक महिन्यापासून सुरू झाली होती. परंतु, याची माहिती अनेकांना नसल्यामुळे लोकांचे पहाटेच येऊन बसणे सुरूच होते. त्यामुळे गोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांनी अधिकृतपणे तसा आदेश जारी केला आहे.
एचएमआरएस प्लॅटफॉर्म
गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर हे या प्रकल्पावर काम करीत आहेत. यासाठी एचएमआरएस नामक ऑनलाईन प्लॅटफॉर्म बनविला जात आहे.