...तरच देशाचे महासत्तेत रुपांतर; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:28 IST2025-07-29T12:28:24+5:302025-07-29T12:28:42+5:30
साखळीत 'एक शाम सैनिक के नाम' कार्यक्रम

...तरच देशाचे महासत्तेत रुपांतर; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : देशाच्या सीमारेषेवर स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन संपूर्ण जनतेचे रक्षण करणाऱ्या सैन्यदलातील जवानांचे समर्पण हे सर्वात मोठे कार्य आहे. आज प्रत्येक देशवासीयाने, विशेषतः केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी निष्ठेने काम केल्यास भारत देशाचे जागतिक महासत्तेत रूपांतर सहज शक्य आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
साखळी रवींद्र भवनात अखिल गोवा माजी सैनिक कल्याण संघटनेतर्फे कारगिल विजय दिवस व ऑपरेशन सिंदूर विजयनिमित्त 'एक शाम सैनिक के नाम' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री बोलत होते.
वीर चक्र सेसा मेडल ब्रिगेडियर बी. एम. करियप्पा, सेना मेडल ब्रिगेडियर अनिल परेरा, संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र आमोणकर, उपेंद्र पै रायकर, सचिव रामदास महाले, खजिनदार कृष्णा माजिक आदींची उपस्थिती होती.
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यातील खूप कमी प्रमाणात युवक सैन्यात आतापर्यंत भरती झालेले आहेत. परंतु, सैन्यदलात जाऊनच देशसेवा करण्यापेक्षा आपण समाजात चांगले काम केल्यास त्याचा लाभ राज्याच्या विकासात होईल.
तीच जवानांना मानवंदना
केंद्र किंवा राज्य सरकारातील कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के आपले योगदान दिल्यास सैन्यातील जवानांच्या समर्पणाला आपल्या कार्यातील निष्ठेने आम्ही सर्वांनी दिलेली मानवंदना ठरेल. तेव्हाच हा देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत म्हणून पुढे येईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. यावेळी ब्रिगेडियर बी. एम. करियप्पा यांनी कारगिल युद्धातील विविध थरारक किस्से कथन केले. या युद्धात भारतीय सैनिकांना कशाप्रकारे आपल्या प्राणांची बाजी देत देशाला यश मिळवून दिले याची सविस्तर माहिती सांगितली. तसेच बिग्रेडियर जॉन परेरा यांनी सैन्यदलातील भविष्याबाबत विद्यार्थी व युवांना मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते सैन्य दलात, तसेच इतर सामाजिक कार्यात योगदान दिलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.