विदेशात नोकरी देणाऱ्या नऊ एजन्सीच मान्यताप्राप्त: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 13:34 IST2025-07-30T13:33:38+5:302025-07-30T13:34:23+5:30

आमिष दाखविणाऱ्या बनावट एजन्सींवर कारवाई होणार

only nine agencies providing jobs abroad are approved said cm pramod sawant | विदेशात नोकरी देणाऱ्या नऊ एजन्सीच मान्यताप्राप्त: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

विदेशात नोकरी देणाऱ्या नऊ एजन्सीच मान्यताप्राप्त: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विदेशात नोकरी देण्याचे आश्वासन देऊन गोमंतकीय युवकांची फसवणूक करणाऱ्या बनावट रोजगार एजन्सींविरोधात कारवाई केली जाईल.

परराष्ट्र मंत्रालयाने मान्यता दिलेल्या राज्यात केवळ नऊ रोजगार एजन्सी असून, युवकांनी त्यांच्याशीच व्यवहार करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केले. विदेशात नोकरी मिळणार म्हणून युवकांनी अशा रोजगार एजन्सींच्या दाव्यांना बळी पडू नये. सत्यता पडताळा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

अनेक गोमंतकीय युवकांची फसवणूक : संकल्प

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी लक्षवेधी सूचनेवेळी विदेशात नोकरी देण्याचे आश्वासन देऊन गोमंतकीय युवकांची फसवणूक करणाऱ्या एजन्सींविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली. आमोणकर म्हणाले, की, आपल्या मतदारसंघात ३८ युवकांना विदेशात नोकरीसाठी पाठवतो, असे सांगून बनावट रोजगार एजन्सींनी फसवणूक केली आहे. विदेशात नोकरी देण्यासाठी युवकांकडून १५ ते २० लाख रुपये घेतले जातात. विदेशात असलेल्या नोकरीत चांगला पगार, राहण्याची व्यवस्था केली जाईल, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात जेव्हा युवक तेथे पोहोचतात, तेव्हा तेथे काहीच नसते. उलट घुसखोरीप्रकरणी तेथील पोलिस त्यांना अटक करतात. अशा बनावट एजन्सींवर कारवाई करावी.

आतापर्यंत १५ गुन्हे, १५ जण अटकेत

यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, विदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून युवकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या बनावट एजन्सींविरोधात राज्यात आतापर्यंत १५ गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहे. याप्रकरणी १५ जणांनाही अटक केली आहे. २०२२ साली दोन गुन्हे नोंदवून २ जणांना अटक केली. २०२३ मध्ये तीन गुन्हे व तीन जणांना अटक झाली. २०२४ मध्ये चार गुन्हे व तिघांना अटक झाली. तर, २०२५ मध्ये आतापर्यंत सहा गुन्ह्यांमध्ये सात जणांना अटक केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाने राज्यात केवळ नऊ रोजगार एजन्सींना मान्यता दिली आहे. युवकांनी त्यांच्याशीच व्यवहार करावा. सरकार याबाबत जागृती करीत आहे. पण लोकांनीसुद्धा जागृत राहावे.

 

Web Title: only nine agencies providing jobs abroad are approved said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.