गोव्यात मतदार यादीतून एक लाख नावे रद्द; मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 13:22 IST2025-12-13T13:22:05+5:302025-12-13T13:22:05+5:30
या मतदारांपैकी काही जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही स्थलांतरित असून काही दुबार नावे असल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्यात मतदार यादीतून एक लाख नावे रद्द; मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मतदारयादीच्या विशेष उजळणी मोहिमेतून (एसआयआर) गोव्यात एक लाख मतदारांची नावे यादीतून रद्द होतील, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी दिली आहे. राज्यात सध्या ११ लाख ८५ हजार ०३४ इतक्या मतदारांची नोंदणी आहे. त्यापैकी एक लाख नावे रद्द केली जातील. या मतदारांपैकी काही जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही स्थलांतरित असून काही दुबार नावे असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य निवडणूक अधिकारी गोयल म्हणाले की, राज्यात एसआयआर मोहीम हाती घेण्यात आली. त्याअंतर्गत बीएलओंनी घरोघरी जाऊन मतदारांच्या नावांची पडताळणी केली. मतदारांकडून प्रगणना फॉर्म भरून घेतले जात आहेत. मात्र असेही काही मतदार आहेत, ज्यांच्या घरांना बीएलओंनी वारंवार भेट देऊनही ते त्यांना भेटलेले नाहीत. अशा मतदारांची नावे मतदार यादीत नसतील.
गोयल यांनी सांगितले की, 'ज्या मतदारांनी प्रगणना फॉर्म भरून दिले, मात्र त्यांची नावे २००२ च्या मतदार यादीत दिसून आली नव्हती, त्यांची नावे १६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या मसुदा मतदार यादीत दिसून येतील. मात्र त्यांना निवडणूक नोंदणी कार्यालयाकडून नोटीस बजावली जाईल.
पोर्तुगीज पासपोर्टधारकही वगळले जाण्याची शक्यता
दरम्यान, 'राज्यातील अनेक लोक पोर्तुगीज पासपोर्ट घेऊन अन्य देशांमध्ये नोकरीनिमित आहेत. मात्र यापैकी अनेकांची नावे अजूनही मतदारयादीतून वगळण्यात आलेली नाही. पोर्तुगीज पासपोर्ट असलेल्या गोमंतकीयांचीही नावेही मतदार यादीतून वगळली जाणार असल्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादीत एकही दुबार, स्थलांतरीत अथवा मृत मतदार राहू नये याची खबरदारी घेत मतदार यादीची पडताळणी केली आहे.